Indigo flight Viral Video : माझी ड्युटी संपली असं सांगून वैमानिक रुसून बसल्यामुळं व विमान उड्डाण करण्यास नकार दिल्यानं पुण्याहून बेंगळुरूला जाणारं इंडिगो विमान तब्बल पाच तास रखडलं. त्यामुळं प्रवाशांचे अक्षरश: हाल-हाल झाले. याबाबतचा विमानातील गोंधळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ही घटना २४ सप्टेंबर रोजी घडली होती, परंतु विमानाच्या आतील फूटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता त्याकडं सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ते बेंगळुरू इंडिगो विमान चालवलं असतं तर पायलटनं आपल्या कामाच्या वेळेची मर्यादा ओलांडली असती. त्यास पायलट तयार नव्हता, असं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.
फ्लाइटरडार २४ च्या आकडेवारीनुसार, हे विमान पुण्याहून रात्री १२.४५ वाजता निघणार होतं. त्याऐवजी हे विमान पहाटे ५ वाजून ४४ मिनिटांनी उड्डाण करून ६ वाजून ५० मिनिटांनी बेंगळुरूला उतरलं.
ड्युटी मर्यादा हा स्टँडर्ड प्रोटोकॉल असला तरी एअरलाइन्सकडून स्पष्टीकरण मिळत नसल्याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. व्हायरल व्हिडिओमध्ये वैमानिक कॉकपिटचा दरवाजा बंद करताना दिसत असून प्रवासी स्पष्टीकरण मागण्यासाठी उभे होते. प्रवाशांना नाश्ता देण्यात आला नाही किंवा त्यांना नुकसान भरपाईही देण्यात आली नाही, असा दावा व्हायरल झालेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओवर हवाई वाहतूक तज्ज्ञ संजय लाझर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जगभरातील नियामकांकडून वैमानिक आणि क्रू ड्युटीचे तास निश्चित केले जातात. वैमानिक त्यांच्या ड्युटीची मर्यादा ओलांडू शकत नाहीत. तसं केल्यास डीजीसीएकडून दंड आकारला जातो आणि पायलटचा विमान उड्डाण परवाना अडचणीत येऊ शकतो. त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीनं पायलटची भूमिका योग्य होती. त्यानं उशीर केला नाही,' असं लाझार यांनी म्हटलं आहे.
इंडिगोनं ३० सप्टेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात फ्लाइटला उशीर झाल्याची कबुली दिली आहे. पाच तासांच्या विलंबासाठी विमान कंपनीनं अंतर्गत कामकाजाशी संबंधित कारणं दिली आहेत.
२४ सप्टेंबर २०२४ रोजी पुण्याहून बेंगळुरूला जाणारं विमान ६ ई ३६१ उड्डाणाच्या वेळेच्या मर्यादेमुळं विलंबानं धावलं. ग्राहकांना विलंबाबद्दल माहिती दिली गेली आणि ग्राहकांना मदत करण्यासाठी आमची टीम तिथं उपलब्ध होती. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही माफी मागतो, असं इंडिगोनं निवेदनात म्हटलं आहे.
संबंधित बातम्या