Indigo Flight Viral Video: अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर आज मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. संपूर्ण देशभरात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर इंडिगो विमानाने अयोध्याला जाणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात प्रवाशी राम आयेंगे हे गाणे गाताना दिसत आहेत. भारत सरकारच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ही क्लिप शेअर करण्यात आली.
या व्हिडिओमध्ये प्रवासी भक्तिगीत गाताना आणि टाळ्या वाजवताना दिसत आहेत. काही जण आपल्या स्मार्टफोनमध्ये हे दृश्य रेकॉर्ड करताना ही दिसले. अयोध्येला जाणाऱ्या विमानातील प्रवासी आपला उत्साह दाखवत एकजुटीने गाताना दिसत आहेत. अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवणारा हा खरोखरच उत्साहवर्धक अनुभव आहे, असे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले.
ही पोस्ट काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली. या व्हिडिओला आतापर्यंत १४ दक्षलक्षाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच या व्हिडिओला मोठी पसंती दर्शवली जात आहे.
याआधी जर्मन गायिका कॅसेंड्रा माई स्पिटमन हिने गायलेल्या राम आयंगे या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिचा आवाज सुंदर असल्याचे म्हटले होते. इतरांनीही तिचे हिंदी बोलण्याचे कौशल्य किती चांगले आहे, याबद्दल सांगितले.