IndiGo flight : बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे इंजिन हवेतच निकामी झाल्याने कोलकाता विमानतळावर आणीबाणी जाहीर करत विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या मोकळ्या करून विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरुप आहेत.
विमानतळाच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, एका प्रवाशाने इंजिनमध्ये आग लागल्याचा दावा केला असला तरी एअरलाइन्स किंवा विमानतळाच्या अधिकाऱ्यांकडून याला दुजोरा मिळालेला नाही. या विमानातील क्रूसह सर्व १७३ जण सुरक्षित आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. (Emergency declared at Kolkata runway)
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, नीलांजन दास नावाच्या एका प्रवाशाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार उड्डाणानंतर काही वेळातच इंजिनातून वेगळ्या प्रकारचा आवाज ऐकू येऊ लागला. आणि विमान कोलकात्याच्या दिशेने झोपावण्याआधीच इंजिनमधून आगीच्या ज्वाळा निघताना दिसल्या.
विमानतळावरील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विमान ६ ई ०५७३ च्या पायलटने उड्डाणानंतर काही मिनिटांतच आपत्कालीन इंजिन निकामी झाल्याची माहिती दिली. धावपट्टीची तातडीने पाहणी करून पायलटसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने विमान दोन्ही दिशेने उतरू शकले. शुक्रवारी रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी हे विमान एकाच इंजिनवर सुखरूप उतरले.
इंजिन निकामी होणे ही गंभीर आणीबाणी आहे. परंतु हे असामान्य नाही. सुदैवाने विमान सुखरूप उतरले,' अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
अशा घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. न्यूझीलंडच्या अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, क्वीन्सटाऊनहून मेलबर्नला जाणाऱ्या एका प्रवासी विमानाच्या एका इंजिनला आग लागल्याने त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, व्हर्जिन ऑस्ट्रेलिया बोईंग ७३७-८०० विमानाला लागलेल्या आगीमुळे इंजिन बंद पडले.
मार्च महिन्यात फ्लोरिडाला जाणाऱ्या युनायटेड एअरलाइन्सच्या बोईंग विमानाच्या जेट इंजिनला आग लागल्याने उड्डाणानंतर लगेचच टेक्सासमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. प्रवासी खिडक्यांजवळ विमानाच्या डाव्या पंखाखालून ठिणग्या येत असल्याचे या घटनेचे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाच्या एका इंजिनमध्ये बिघाड झाल्याने उड्डाणानंतर लगेचच आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. पाटणा विमानतळाच्या संचालिका आंचल प्रकाश यांनी सांगितले की, एअरबस ३२० (६ ई २४३३) च्या प्रस्थानानंतर तीन मिनिटांनी विमानाचे एक इंजिन निकामी झाल्याचे निदर्शनास आले आणि विमान सुखरूप परत उतरले.