Georgia 12 Indian Death : जॉर्जियातील गुदुरी या पर्वतीय भागातील एका रिसॉर्टमध्ये १२ भारतीय नागरिकांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमधील प्राथमिक तपासात विषारी वायू कार्बन मोनोऑक्साइडची गळती झाल्यामुळे या सर्वांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सर्व मृत व्यक्ति हे दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या खोलीत झोपले होते. यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. जॉर्जियाच्या गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, मृतदेहांच्या प्राथमिक तपासणीच्या आधारे त्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखम किंवा मारहाणीच्या खुणा नाहीत.
जॉर्जियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ठार झालेल्या १२ जणांपैकी ११ जण परदेशी नागरिक होते, तर एक जॉर्जियन नागरिक होता. दरम्यान, तिबिलिसी येथील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी हिंदुस्थान टाईम्सला सांगितले की, मृत्युमुखी पडलेले सर्व जण हॉटेलमध्ये काम करणारे भारतीय नागरिक होते.
जॉर्जियातील गुडोरी येथे १२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी आम्हाला मिळाली आहे. मृत नागरिकांची माहिती घेण्यासाठी आम्ही स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहोत. मृतांच्या कुटुंबियांप्रती आम्हाला संवेदना आहेत. आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे येथील स्थानिक दुतावासाने सांगितले.
प्राथमिक तपासात विजेच्या जनरेटरमधून कार्बन मोनॉक्साईडची गळती झाल्याने जीव गुदमरून या सर्वांचा झोपतेच मृत्यू झाला असल्याची शक्यता आहे. हे मजूर ज्या खोलीत रात्री झोपले होते त्या खोलीत जनरेटर एका बंदिस्त जागेत ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या जनरेटर मधून गॅस गळती होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप काहीही निश्चित सांगण्यात आलेले नाही. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळाशी संबंधित सर्व लोकांची चौकशी केली जात आहे. जॉर्जियन पोलिसांनी फौजदारी संहितेच्या कलम ११६ अन्वये निष्काळजीपणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित बातम्या