
Fact Check : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेतून बेकायदा स्थलांतरितांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरूच आहे. अमेरिकेच्या लष्करी विमानातून तब्बल १०४ भारतीयांना बुधवारी पंजाबमधील अमृतसरमध्ये आणण्यात आले. या भारतीयांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोसह काही अफवादेखील पसरल्या असून ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, या परत आलेल्या या भारतीयांना अमेरिकेतून बेड्या घालून परत पाठवण्यात आलं आहे.
व्हायरल झालेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, भारतीयांना हातात आणि पायांना बेड्या बांधून पाठवण्यात आलं आहे. एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, २०० हून अधिक भारतीयांना अमानुष पद्धतीने अमेरिकेतून काढून टाकण्यात आलं आहे. त्यांच्या हाताला बेड्या बांधण्यात आल्या होत्या तर पाय देखील बांधून ठेवण्यात आले होते. त्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक दिली गेली. तसेच लांब विमान प्रवासात त्यांना टॉयलेटला जाण्याची देखील परवानगी देण्यात आली नव्हती. एस. जयशंकर, मोदी सरकार आपल्याच नागरिकांसाठी सन्मानाने वाहतुकीची व्यवस्था करू शकले नसते का? ग्लोबल विश्वगुरू या ग्लोबल शेम? असे व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हा प्रकार खरा आहे की खोटा या बाबत फॅक्ट चेक करण्यात आले आहे. हा फोटो खोटा असल्याचा दावा सरकारी एजन्सिने केला आहे.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना अमेरिकेतून हद्दपार करताना त्यांना बेड्या लावण्यात आल्याचा दावा करत अनेक अकाऊंट्सद्वारे सोशल मीडियावर फेक फोटो शेअर केला जात आहे. पीआयबीने म्हटले आहे की, "या पोस्टमध्ये जो फोटो शेअर केला जात आहे तो भारतीयांचा नाही, तर ग्वाटेमालाला पाठविल्या जाणाऱ्यांचा आहे."
१०४ बेकायदा भारतीय स्थलांतरितांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान बुधवारी दुपारी श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये पंजाबमधील ३०, हरियाणा आणि गुजरातमधील प्रत्येकी ३३, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी ३ आणि चंदीगडमधील दोन जणांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये १९ महिला आणि १३ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे, ज्यात एक चार वर्षांचा मुलगा आणि पाच आणि सात वर्षांच्या दोन मुलींचा समावेश आहे.
संबंधित बातम्या
