Anju in Pakistan : आपल्या फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहला भेटण्यासाठी भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू सध्या देशभरासह पाकिस्तानाही चर्चेचा विषय बनली आहे.अंजू पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतात तिच्या प्रियकराच्या घरात रहात आहे. अंजू आणि नसरुल्लाह यांनी निकाह केल्याच्या बातम्या प्रसारित होत असताना आता अंजूच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.अंजूचे वडील गया प्रसाद यांनी म्हटले आहे की, ज्या वेळी त्यांची मुलगी भारतातून पाकिस्तानात गेली, त्याचवेळी तिच्याशी असणारे नाते संपले.
अंजूचे वडील गया प्रसाद यांनी म्हटले की, तिच्या दोन मुलांचे भविष्य बर्बाद झाले आहे. ती आपल्या दोन मुलांना व पतीला सोडून पाकिस्तानात गेली आहे. तिने आपल्या मुलांबाबतही विचार केला नाही. जर तिला असे करायचे होते तर तिने आधी पतीला घटस्फोट द्यायला हवा होता. आता अंजू आमच्यासाठी मेली आहे.
गया प्रसाद यांनी म्हटले की, तिची मानसिक अवस्था ठीक नाही, त्यामुळेच तिने असे पाऊल उचलले आहे. अंजू तिच्या इच्छेने कशीही वागत आहे. आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की, आमची मुलगी असे काही करेल. काही लोक असे असतात ज्यांना काही करायची लहर आली की, ते करतातच. मला हे बोलतानाही लाज वाटत आहे. कारण ही केवळ आमचीच बाब नसून संपूर्ण देशाशी निगडित बाब आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, जे झाले ते खूप लाजीरवाणे आहे. काही लोक खूप जिद्दी असतात. एकदा त्यांनी कोणती गोष्ट करण्याचे मनावर घेतले की, ते करतातच. मी कधी तिला कशाबद्दल अडवले तर ती माझेही ऐकत नव्हती. मला लाज वाटत आहे की, मी अशा मुलीचा बाप आहे.