भारतीय रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे स्लीपर (vande bharat sleeper trains ) व्हेरिएंट सादर करण्याच्या तयारीत आहे. ही ट्रेन २०० किलोमीटर प्रतितास गतीने धावणार असून याचे डिझाईन लांबच्या प्रवासासाठी खास तयार केले आहे. त्यामुळे शक्यता वर्तवली जात आहे की, भारतीय रेल्वे शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसचे संचालन बंद करणार आहे? आता हाय-स्पीड वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर ट्रेन शताब्दी (Shatabdi Express ) व राजधानी एक्सप्रेसची (rajdhani express) जागा घेणार? असाही सवाल उपस्थित होत आहे की, मुंबईत वंदे मेट्रो सर्विससोबत वंदे भारत नेटवर्कचा विस्तारही केला जाणार आहे.
दरम्यान, रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले की, वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन टप्प्या-टप्प्याने शताब्दी एक्सप्रेसची जागा घेईल. या सेमी-हाय-स्पीड स्वदेशी ट्रेनच्या स्लीपर व्हेरिएंटला राजधानी एक्सप्रेस ट्रेनला पर्याय म्हणून पाहिले जात आहे. राजधानी एक्सप्रेस ट्रेन्सला इंडियन रेल्वेची प्रीमियम सेवा म्हणून ओळखले जाते. ही एक्सप्रेस राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीला विविध राज्यांच्या राजधान्यांना जोडते.
चेन्नई येथील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीचे महाव्यवस्थापक बीजी माल्या यांनी फायनान्शियल एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखातीत मोठे वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, अनेक शहरात वंदे भारत एक्सप्रेस लाँच केली आहे. या ट्रेनचे शेड्यूल शताब्दी एक्सप्रेसशी मिळते-जुळते आहे. यामुळे शक्यता वर्तवली जात आहे की, शताब्दी ट्रेनच्या जागी वंदे भारत ट्रेन सुरू होऊ शकते.
वंदे भारत एक्सप्रेसची वाढती लोकप्रियता -
वंदे भारत एक्सप्रेस देशातील पहिली सेमी-हाय-स्पीड ट्रेन आहे. भारतीय रेल्वेची सहायक कंपनी इंटीग्रल कोच फॅक्ट्री (ICF) कडून या एक्सप्रेसला डेव्हलप आणि डिझाइन केले आहे. ही एक्सप्रेस दिसायला आकर्षक असून संपूर्ण वातानुकूलित आहे. वंदे भारत ट्रेन प्रवाशांसाठी जागतिक दर्जाची सुविधा व सेवा पुरवते. यामुळे प्रवाशांमध्ये वंदे भारत ट्रेन खूपच लोकप्रिय आहे. यामुळे भारतीय रेल्वे आता याचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. संपूर्ण देशात वंदे भारत ट्रेनचे जाळे तयार केले जात आहे.