Vande Bharat Express : भारतीय रेल्वे जम्मू-काश्मीरसाठी २ विशेष ट्रेन चालवण्याच्या तयारीत आहे. येत्या काही महिन्यांत काश्मीरशी कनेक्टिव्हिटी वाढवण्याची रेल्वेची योजना असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याअंतर्गत नवी दिल्ली ते श्रीनगर दरम्यान विशेष स्लीपर ट्रेन चालवण्यात येणार आहे. ही एक सेंट्रल हीटेड ट्रेन असून यात प्रवाशांना थंडी वाजणार नाही. तसेच ही ट्रेन हे अंतर १३ तासात पूर्ण करणार आहे. विशेष म्हणजे ही ट्रेन बर्फाच्छादित डोंगररांगांतून जाणार असल्याने प्रवाशांना निसर्गाचा आनंद देखील घेता येणार आहे. गातील सर्वात उंच रेल्वे आर्क ब्रिज असलेल्या चिनाब पुलावरून देखील ही गाडी जाणार आहे.
नवी दिल्ली ते श्रीनगर ही वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांसाठी खास ठरणार आहे. या ट्रेनमध्ये सेकंड क्लास स्लीपर कोचची सुविधा दिली जाणार नसली तरी या गाडीचा प्रवास हा खास राहणार आहे. पूर्वी ही वंदे भारत स्लीपर ट्रेन काश्मीरमधूनही जाईल, असे मानले जात होते, पण सध्या तरी तसे कोणतेही नियोजन नाही. कटरा-बारामुल्ला मार्गाबाबत बोलायचे झाले तर ८ डब्यांची वंदे भारत ट्रेन चालवण्यात येणार आहे. त्यात चेअर कार म्हणजेच बसण्याची सुविधा राहणार आहे.
जम्मू-काश्मीरसाठी धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये काही खास वैशिष्ट्ये असतील. थंडी पासून बचाव करण्यासाठी सिलिकॉन हीटिंग पॅड या ट्रेनमध्ये बसवण्यात आले आहे. तर स्वच्छतागृहांमध्ये देखील उबदार हवा प्रणाली बसवण्यात आली आहे. या मार्गावरील वंदे भारत ट्रेनमुळे कटरा-बारामुल्ला दरम्यानचे २४६ किलोमीटरचे अंतर साडेतीन तासांनी कमी होणार आहे. सध्या बसने या दोन शहरांमधील अंतर कापण्यासाठी सुमारे १० तास लागतात. बारामुल्ला रेल्वे स्थानक श्रीनगरपासून ५७ किमी अंतरावर आहे. त्यामुळे लवकरच जम्मू-काश्मीरच्या जनतेला भारतीय रेल्वेकडून मोठी भेट मिळणार आहे. यामुळे वाहतुकीची सोय वाढेल आणि विकास देखील साधला जाणार आहे.
संबंधित बातम्या