Amrit Bharat Train : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) पुढील महिन्यात आणखी एक अमृत भारत ट्रेन देणार आहे. ही नवी ट्रेन सध्याच्या अमृत भारत ट्रेनसेटचे मॉडर्न व्हेरिएंट असेल. रेल्वे मंत्रालयाने पुढील दोन वर्षांत ५० अमृत भारत २.० गाड्यांच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या दिशेने वेगाने काम सुरू आहे. अल्प उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबांना डोळ्यासमोर ठेवून अमृत भारत ट्रेनची रचना करण्यात आली आहे. अमृत भारत २.० ही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी परवडणारी सेवा पुरवते. तसेच यामध्ये मिळणाऱ्या सुविधांमुळे प्रवासी चांगलेच प्रभावित झाले आहेत.
अमृत भारत ट्रेन २०२३ मध्ये सुरू करण्यात आली होती. यात लांब पल्ल्याचा प्रवास सहज पार केला जातो. यात दोन प्रकारचे डबे असतात. पहिला स्लीपर क्लास आहे, जो राखीव प्रवाशांसाठी आहे. दुसरा जनरल क्लास आहे, जो अनारक्षित प्रवाशांसाठी आहे. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आयसीएफ अमृत भारत ट्रेनसेटच्या तिसऱ्या रॅकचे उत्पादन आणि वितरण मार्चमध्ये पूर्ण करेल. तिसऱ्या अमृत भारत रॅकच्या पॅन्ट्री कारचे आयसीएफच्या फर्निशिंग विभागात वायरिंग आणि फिटमेंटचे काम सुरू आहे. येत्या १५-२० दिवसांत या रॅकची डिलिव्हरी होऊ शकते.
अमृतभारत ट्रेन २.० मध्ये २२ कोच-रेक फॉर्मेशन आहेत, ज्याच्या दोन्ही टोकांना लोकोमोटिव्ह आहेत. ट्रेनमध्ये Loco+1 LSLRD+5 LWS+4 LWSCN+1 LWCD+4 LWSCN +6 LWS +1 LSLRD+ Loco चे फॉर्मेशन असेल. याआधी अमृत भारत ट्रेन १.० मध्येही २२ कोच फॉर्मेशन होते, मात्र त्यामध्ये Loco+ 1 LSLRD+ 4 LWS+12 LWSCN+4 LWS+ 1 LSLRD+ Loco चे फॉर्मेशन होते.
अमृत भारत ट्रेन २.० पुश-पुल तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली आहे, जी कार्यक्षम प्रवासासाठी आहे. या गाडीचा वेग ताशी १३० किमी असेल. ट्रेनमध्ये पुश-पुल ऑपरेशनसाठी कंट्रोल कपलर असतील आणि उच्च त्वरणासाठी दोन्ही टोकांवर लोकोमोटिव्ह असतील. शॉक फ्री प्रवास आणि सहज कनेक्शनसाठी या ट्रेनमध्ये सेमी ऑटोमॅटिक कपलर्स असतील.
संबंधित बातम्या