Vande Bharat Express : ‘वंदे भारत’ एक्सप्रेस ट्रेननं भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. मागच्या काही वर्षांत अनेक वंदे भारत गाड्या सुरू झाल्या असून त्यामुळं प्रवाशांचा बहुमोल वेळ वाचत आहे. देशातील बहुतेक राज्यांना आतापर्यंत वंदे भारत गाड्या मिळाल्या आहेत. आता त्यात आणखी भर पडणार आहे. या वर्षी देशात ६० नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहेत.
भारतीय रेल्वे 'वंदे भारत' गाड्या वाढवण्यासाठी सातत्यानं काम करत आहे. २०२३ मध्ये एकूण ३४ वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. 'मनी कंट्रोल'नं दिलेल्या वृत्तानुसार, वंदे भारत ट्रेनसाठी डबे बनवण्याचं काम वेगानं सुरू आहे. या वर्षी भारतीय रेल्वेला ७० वंदे भारत गाड्या मिळणार आहेत, त्यापैकी ६० गाड्या १५ नोव्हेंबरच्या आधी मिळतील. या गाड्या नवीन मार्गांवर सुरू करण्यात येणार आहेत. वर्षभरात ६० नवीन वंदे भारत गाड्या सुरू झाल्यास लाखो रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत ट्रेनसाठी मार्गांची निवड राज्य सरकार, भारतीय रेल्वे आणि स्वतंत्र सल्लागाराशी चर्चेनंतर आणि केस स्टडीच्या आधारे होते. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर रेल्वे बोर्डाची मंजुरी घेतली जाते आणि त्यानंतर वंदे भारत गाड्यांचे नवीन मार्ग ठरवले जातात. जिथं वंदे भारत गाड्या सुरू करता येतील असे ३५ मार्ग आतापर्यंत रेल्वेनं शोधले आहेत. याशिवाय, या विषयावर सातत्यानं संशोधन व अभ्यास सुरू आहे.
कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडू, केरळ या सरकारांनी नवीन मार्गावरील वंदे भारत गाड्यांसाठी रेल्वेशी संपर्क साधला आहे. त्यावरही विचार केला जात असल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली.
आतापर्यंत जवळपास सर्वच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून वंदे भारत सुरू करण्यासाठी विनंत्या आल्या आहेत. मात्र, भारतीय रेल्वेनं जून २०२४ पर्यंत १८ नवीन मार्गांवर वंदे भारत गाड्या सुरू करण्याची योजना आखली आहे आणि त्यानंतर जुलैपासून दर पंधरवड्याला चार नवीन मार्गांवर गाड्या सुरू होतील.
वंदे भारत ट्रेन अनेक नवीन मार्गांवर सुरू करण्यात येणार असल्याचं समजतं. ३४ वंदे भारत ट्रेन उत्तरेकडील राज्यांमध्ये सुरू केल्या जातील, तर २५ दक्षिण भारतात सुरू केल्या जातील. या वर्षी मुंबई ते शेगाव, पुणे ते शेगाव, बेळगाव ते पुणे, रायपूर ते वाराणसी आणि कोलकाता ते रुरकेला यांचा समावेश आहे. याशिवाय गुजरातला दोन वंदे भारत गाड्या मिळण्याची अपेक्षा आहे. यातील एक ट्रेन वडोदरा ते पुणे मार्गावर धावेल.