रेल्वेने बदलला तिकीट आरक्षणाचा नियम, १२० ऐवजी आता फक्त इतके दिवस आधी बुकिंग करता येणार!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रेल्वेने बदलला तिकीट आरक्षणाचा नियम, १२० ऐवजी आता फक्त इतके दिवस आधी बुकिंग करता येणार!

रेल्वेने बदलला तिकीट आरक्षणाचा नियम, १२० ऐवजी आता फक्त इतके दिवस आधी बुकिंग करता येणार!

Oct 17, 2024 03:21 PM IST

Railway Reservation Rule change : रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. प्रवासी आगाऊ तिकीट बुक करतात, पण आता रेल्वेने आरक्षण नियमात मोठा बदल केला आहे. १२० दिवसांऐवजी आता तुम्ही फक्त ६० दिवस अगोदर बुकिंग करू शकता.

रेल्वे आरक्षणाच्या नियमात बदल
रेल्वे आरक्षणाच्या नियमात बदल

Indian Railway Ticket Booking Rule : प्रवाशांचा प्रवास सुरळीत आणि आरामदायक व्हावा यासाठी भारतीय रेल्वे वेळोवेळी पावले उचलत असते. आता तिकीट आरक्षणासंदर्भात रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता केवळ ६० दिवस आधीच तिकीट बुक करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून १ नोव्हेंबरपासून नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. सध्या प्रवाशांना १२० दिवस म्हणजे ४ महिने आधी  रेल्वेचे तिकीट बुक करता येते. रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी हा आदेश जारी केला आहे.

रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, प्रवासी सध्या आरक्षित तिकिटे मिळविण्यासाठी १२० दिवस अगोदर बुकिंग करतात, परंतु १ नोव्हेंबरपासून यात बदल केला जात आहे आणि हा कालावधी कमी करून ६० दिवस केला जात आहे. यामुळे ३१ ऑक्टोबरपर्यंत बुक झालेल्या तिकिटांवर परिणाम होणार नसून प्रवाशांना १२० दिवस अगोदर तिकीट घेता येणार आहे. प्रवासी तिकीटे रद्दही करू शकतात ज्यांच्या प्रवासाचा कालावधी  ६० दिवसांपेक्षा जास्त शिल्लक राहिला आहे. 

ताज एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस आदी दिवसा धावणाऱ्या गाड्यांना या नियमाचा फटका बसणार नाही. त्यांना पूर्वीसारखीच कालमर्यादा कायम राहणार आहे. याशिवाय परदेशी पर्यटक गाड्यांनाही या आदेशाचा फटका बसणार नाही. ते ३६५ दिवस अगोदर बुक केले जाऊ शकतात.

जर तुम्ही तिकीट बुक केले असेल तर काय परिणाम होईल?

दिवाळी-छठसारख्या सणांमुळे अनेकांनी आरक्षण सुरू होताच तिकिटे बुक केली असतील. तुम्हीही या यादीत असाल तर काळजी करण्याची गरज नाही. वास्तविक, रेल्वेच्या या निर्णयाचा परिणाम ३१ ऑक्टोबरपर्यंत बुक झालेल्या तिकिटांवर होणार नाही. म्हणजेच चार महिन्यांपर्यंतची तिकिटे या महिन्याच्या अखेरपर्यंत बुक करता येतील, पण १ नोव्हेंबरपासून फक्त ६० दिवसांपर्यंतच तिकिटे बुक होतील.

रेल्वेचा 'हा' शेअर खरेदी करण्यासाठी उडाली झुंबड -

महिनाभरापासून सुरू असलेला रेल्वे स्टॉक रेलटेलचा शेअर वधारला आहे.  १५५.७२ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्यानंतर रेलटेल कॉर्पोरेशनचा शेअर आज ३ टक्क्यांनी वधारला. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे समभाग आज सुरुवातीच्या व्यवहारात तीन टक्क्यांनी वधारले. सकाळी १० वाजून ४९  मिनिटांनी एनएसएसईवर रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा शेअर 9 रुपये म्हणजेच १.९१ टक्क्यांनी वधारून ४७१ रुपयांवर व्यवहार करत होता.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर