Bibek Debroy Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक परिषदेचे सल्लागार विवेक देबरॉय यांचं वयाच्या ६९ व्या वर्षी शुक्रवारी सकाळी निधन झालं. ते अर्थतज्ज्ञ तसेच प्रसिद्ध लेखक होते. देबरॉय यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत मोलाचं योगदान दिलं आहे. भारतीय आर्थिक धोरणांना आकार देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. देबरॉय यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. डॉ. बिबेक देबरॉय हे अर्थशास्त्र, इतिहास, संस्कृती, राजकारण, अध्यात्म आणि इतर विषयांत पारंगत होते. आपल्या कार्यातून त्यांनी भारताच्या बौद्धिक पटलावर अमिट ठसा उमटवला. सार्वजनिक धोरणातील योगदानापलीकडे आपल्या प्राचीन ग्रंथांवर त्यांनी महत्वाचा अभ्यास केला असं मोदी यांनी म्हटलं आहे.
पद्मश्रीनं सन्मानित झालेल्या देबरॉय यांनी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणूंन महत्त्वाची भूमिका निभावली होती. बिबेक देबरॉय यांनी गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या कुलपतीपदाचा सप्टेंबरमध्ये राजीनामा दिला होता. संस्थेच्या कुलगुरू पदावरून अजित रानडे यांच्या हकालपट्टीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर देबरॉय यांनी कुलपतीपदाचा राजीनामा दिला.
बिबेक देबरॉय यांचा जन्म २५ जानेवारी १९५५ रोजी मेघालयातील शिलाँग येथे झाला. देबरॉय यांनी कोलकाता शहरातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर राजधानी दिल्लीतल्या दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेतून तसंच ट्रिनिटी महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
मोदी सरकारने नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली, तेव्हा देबरॉय यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. जानेवारी २०१५ मध्ये ते नीती आयोगाचे स्थायी सदस्य झाले. २०१९ पर्यंत त्यांनी नीती आयोगात मोलाची भूमिका बजावली. सप्टेंबर २०१७ मध्ये देबरॉय यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधानांना आर्थिक बाबींवर सल्ला देणाऱ्या समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांना नेमण्यात आले. याशिवाय सप्टेंबर २०१८ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत त्यांनी भारतीय सांख्यिकी संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.
जागतिकीकरणानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत धोरणं ठरवताना देबरॉय यांचा सिंहाचा वाटा होता. नीती आयोगाचे सदस्य राहिलेल्या देबरॉय यांनी रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी पाठपुरावा केला. त्यांनी केलेल्या सूचना अंमलात आणल्यामुळेच भारतीय रेल्वे हा उपक्रम हा जगातल्या सर्वोत्तम अशा सार्वजनिक वाहतूक उपक्रमांपैकी एक होऊ शकला.
बिबेक देबरॉय यांचे आजी-आजोबा बांगलादेशातील सिलहटयेथून भारतात आले होते. त्यांचे वडील भारत सरकारच्या इंडियन ऑडिट अँड अकाऊंट्स सर्व्हिसमध्ये कार्यरत होते. देबरॉय यांचे प्राथमिक शिक्षण पश्चिम बंगालमधील नरेंद्रपूर येथील रामकृष्ण मिशन स्कूलमधून झाले. कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतली. देबरॉय यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यासाठी ते दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आले. त्यानंतर ट्रिनिटी कॉलेजच्या शिष्यवृत्तीवर पुढील शिक्षणासाठी ते केंब्रिज विद्यापीठात गेले.