uzbekistan over cough syrup deaths : भारतात उत्पादित होणारे कफ सिरप पिऊन ६८ मुलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी उझबेकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी भारतीय उद्योगपती राघवेंद्र प्रताप यांच्यासह २१ जणांना शिक्षा सुनावली. मध्य आशियाई देशात २०२२ ते २०२३ दरम्यान किमान ८६ मुलांना ही कफ सिरप देण्यात आले होते, त्यापैकी ६८ मुलांचा मृत्यू झाला होता.
उझबेकिस्तानमध्ये डॉक-१ मॅक्स सिरप आयात करणाऱ्या कंपनीचे संचालक राघवेंद्र प्रताप यांना २० वर्षांची कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उझबेकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, भ्रष्टाचार, कर फसवणूक आणि बनावटगिरी प्रकरणी राघवेंद्र प्रताप हे दोषी आढळले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने जानेवारी २०२३ मध्ये सांगितले की सिरपच्या नमुन्यांवरून असे दिसून आले आहे की ते डायथिलीन ग्लायकोल किंवा इथिलीन ग्लायकोल, औद्योगिक सॉल्व्हेंट्स म्हणून वापरल्या जाणाऱ्या विषारी पदार्थांनी दूषित होते. याचे सेवन केल्यास आरोग्यावर गंभीर परिमाण होऊ शकतो. यानंतर भारताने कफ सिरप उत्पादक कंपनी मॅरियन बायोटेकचा उत्पादन परवाना रद्द केला होता.
याच काळात, भारतातून आयात करण्यात आलेल्या दुसऱ्या कफ सीरप पायल्याने गॅम्बियामध्ये किमान ७० मुलांचा मृत्यू झाला. इंडोनेशियामध्ये, २०२२ ते २०२३ दरम्यान २०० हून अधिक मुलांच्या मृत्यूशी संबंधित अशाच कंटेनरमध्ये आणखी एक दूषित सिरप आढळले होते.