Indian Bus Fall Into River In Nepal: नेपाळमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. भारतीयांना घेऊन जाणारी बस तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली. अपघातग्रस्त बस पोखराहून काठमांडूला जात होती, अशी माहिती नेपाळच्या एका अधिकाऱ्याने दिली. सशस्त्र पोलीस दलाचे प्रवक्ते शैलेंद्र थापा यांनी सांगितले की, बसमधून बाहेर काढण्यात आलेल्यांपैकी १४ जणांना मृत घोषित करण्यात आले असून १६ जण जखमी झाले आहेत.
नेपाळ पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ४० प्रवाशांना घेऊन जाणारी एक भारतीय प्रवासी बस शुक्रवारी तानाहुन जिल्ह्यातील मर्स्यांगदी नदीत कोसळली. तानाहुन येथील जिल्हा पोलिस कार्यालयाचे डीएसपी दीपकुमार राया यांनी सांगितले की, ‘नंबर प्लेट यूपी एफटी ७६२३ क्रमांक असलेली बस मर्स्यांगडी नदीत कोसळली. ही बस पोखराहून काठमांडूच्या दिशेने जात होती.’
नेपाळमध्ये भारतीय प्रवासी बस नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत शोध आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी नेपाळी लष्कराचे एमआय-१७ हेलिकॉप्टर वैद्यकीय पथकासह अपघातस्थळी रवाना झाले आहे.नेपाळ लष्कराच्या दळणवळण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळी लष्कराच्या हेलिकॉप्टरने काठमांडूयेथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हेलिपॅडवरून अपघातस्थळाकडे उड्डाण केले. नेपाळी लष्कराचे प्रवक्ते गौरब कुमार केसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर अपघातस्थळाजवळ उतरले आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी याच हेलिकॉप्टरने काठमांडूला परत पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती प्रवक्त्याने एएनआयला फोनवरून दिली.
उत्तर प्रदेशचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 'नेपाळमधील पोखरा हून काठमांडूला जात असताना गोरखपूरहून एका खासगी बसला अपघात झाल्याची दु:खद बातमी मिळाली. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि जखमींना लवकर बरे व्हावे, यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.