terrorist attack in jammu and kashmir today : काश्मिच्या पुंछमध्ये अतिरेक्यांनी गुरुवारी भारतीय जवानांच्या ताफ्यावर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्यात भारताचे पाच जवान शहीद झाले असून एक जवान जखमी झाला आहे. त्यानंतर आता सुरक्षा दलाकडून पूंछ जिल्ह्यात अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. ढगाळ वापुंछमध्ये तावरणाचा फायदा घेत अतिरेक्यांनी जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याची माहिती नॉर्दर्न कमांडने दिली आहे. दरम्यान, भारतीय लष्कराने या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांची नावे जाहीर केली आहे. त्यांना लष्करी इतमामात श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
हवालदार मनदीप सिंह, लान्स नायक देबाशिष बसवाल, लान्स नायक कुलवंत सिंह, शिपाई हरकृष्ण सिंह आणि शिपाई सेवक सिंह अशी मृत जवानांची नावे असल्याचे नागरोटा इथल्या लष्कराच्या १६ कॉर्प्सने जाहीर केले आहे. या बाबत ट्विट करून त्यांचे छायाचित्र देखील प्रसिद्ध करण्यात आले आहेत. व्हाईट नाईट कॉर्प्स शहीद जवानांच्या शोकाकुल कुटुंबांसोबत एकजुटीने उभे आहे, असं ट्विटरवर म्हटलं आहे. शहीद झालेले जवान भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स युनिटचे होते. या भागात दहशतवादविरोधी कारवायांसाठी ते तैनात होते.
काश्मिरच्या पूंछ जिल्ह्यातल्या भीमबेर गली परिसरात गस्तीसाठी जात असलेल्या जवानांच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी तुफान गोळीबार सुरू केला. त्यानंतर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्यामुळं लष्करी वाहनाला आग लागली. त्यात पाच जवान शहीद झाले आहेत. याशिवाय एक जवान गंभीर जखमी झाला आहे.
जखमी जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता सुरक्षा दलांनी अतिरेक्यांना शोधून काढण्यासाठी संपूर्ण पूंछ जिल्ह्यात सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. काश्मिरमधील या भ्याड हल्ल्याबाबत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या G-20 परिषदेपूर्वी हा नियोजित हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे.