लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील बँका सरासरी मासिक शिल्लक राखण्यात अपयशी ठरल्याबद्दल ग्राहकांवर मोठा दंड आकारतात. ही दंड प्रणाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चक्रव्यूह धोरणाचा एक भाग असल्याचे त्यांनी म्हटले.
नरेंद्र मोदींच्या अमृतकालात सर्वसामान्य भारतीयांचे रिकामे खिसेही कापले जात आहेत. उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपये माफ करणाऱ्या सरकारने किमान शिल्लक ही ठेवू न शकणाऱ्या गरीब भारतीयांकडून ८,५०० कोटी रुपये गोळा केले आहेत. 'पेनल्टी सिस्टीम' हे मोदींच्या चक्रव्यूहाचे दार असून त्याद्वारे सर्वसामान्य भारतीयांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण लक्षात ठेवा, भारतातील जनता अभिमन्यू नाही, अर्जुन आहे, चक्रव्यूह तोडून तुमच्या प्रत्येक अत्याचाराला कसे उत्तर द्यायचे हे त्यांना माहित आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
सोमवारी राहुल गांधी यांनी 'चक्रव्यूह' रूपकाचा वापर करून भीतीचे वातावरण असल्याचे सूचित केले आणि सहा जणांच्या गटाने संपूर्ण देशाला एका चक्रव्यूहात अडकवले, ज्याला नष्ट करण्याची शपथ भारताने घेतली असल्याचे म्हटले.
आर्थिक वर्ष २०१९-२० पासून पाच वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सुमारे ८,५०० कोटी रुपयांचा दंड वसूल केल्याचे लोकसभेत एका लेखी उत्तरात उघड झाल्यानंतर राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सरासरी मासिक किमान शिल्लक न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून सरकारी बँकांनी ठेवीदारांवर २,३३१ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत दिली.
केंद्रीय अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर टीका करताना राहूल गांधी म्हणाले की, मक्तेदारीची रचना मजबूत करणे हे केंद्र सरकारचे प्राथमिक ध्येय आहे. हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रात अभिमन्यू नावाच्या तरुणाची सहा जणांनी चक्रव्यूहात हत्या केली होती, असा उल्लेख करून त्यांनी म्हटले की, चक्रव्यूहात हिंसा आणि भीती चे लक्षण आहे.
गांधींनी महाभारताच्या आख्यायिकेचा उल्लेख केला, जिथे अभिमन्यूला चक्रव्यूहात मारले गेले होते- कमळाच्या आकाराच्या भुलभुलैयासारखे एका योद्ध्याला पकडण्यासाठी डिझाइन केलेली बहुस्तरीय लष्करी रचना असते.
भाजपचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाशी साधर्म्य असल्याने या चक्रव्यूहाला 'पद्मव्यूह' असेही म्हटले जाते, असे त्यांनी नमूद केले. गांधी म्हणाले, 'एकविसाव्या शतकात आणखी एक चक्रव्यूह तयार झाले आहे. ते कमळाच्या रूपात आहे आणि पंतप्रधान (नरेंद्र मोदी) आपल्या छातीवर चिन्ह धारण करतात. अभिमन्यूसोबत जे केले ते भारतासोबत, तेथील युवक, महिला, शेतकरी आणि लघु आणि मध्यम उद्योगांसोबत केले जात आहे.
संबंधित बातम्या