ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताने मोठी तयारी सुरू केली आहे. भारत एक-दोन नव्हे तर ५२ उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. हे सर्व उपग्रह पूर्णपणे लष्करासाठी काम करतील. यामुळे पाकिस्तानसह शत्रू देशांच्या भूभागावर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. याशिवाय लष्करासाठी खास स्पेस डॉक्ट्रिन अंतिम करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने सॅटेलाईट सिस्टिमच्या मदतीने पाकिस्तानच्या विविध लष्करी तळांवर यशस्वी नजर ठेवली होती. यामुळे लष्कराला अचूक लक्ष्य निश्चित करण्यात मदत झाली.
पाळत ठेवण्याच्या कार्यक्रमाचा भाग
भारताने केलेले हे उपग्रह प्रक्षेपण अंतराळ आधारित देखरेख कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या कार्यक्रमाला मंजुरी दिली होती. एकूण खर्च २६९६८ कोटी रुपये आहे. याअंतर्गत इस्रो २१ उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. तर उर्वरित ३१ उपग्रह खासगी कंपन्यांकडून प्रक्षेपित केले जाणार आहेत. पुढील वर्षी एप्रिलमध्ये पहिले दोन उपग्रह प्रक्षेपित केले जातील. तर २०२९ च्या अखेरपर्यंत सर्व ५२ उपग्रह तैनात केले जातील.
संरक्षण मंत्रालयाचा प्रकल्प
संरक्षण मंत्रालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या डिफेन्स स्पेस एजन्सीच्या प्रकल्पाचा हा एक भाग आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, या उपग्रहांच्या प्रक्षेपणाची कालमर्यादा मर्यादेत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सध्या तीन खासगी कंपन्यांशी करार करण्यात आला आहे. या सर्वांना आपले काम अतिशय जलदगतीने करण्यास सांगण्यात आले आहे.
चीन-पाकिस्तानसह हिंदी महासागरावर नजर
मिळालेल्या माहितीनुसार, एसबीएस-3 चा उद्देश चीन आणि पाकिस्तानच्या अधिकाधिक भागांवर लक्ष ठेवणे आहे. याशिवाय हिंदी महासागराच्या प्रदेशावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. याशिवाय स्पेस डॉक्ट्रिनवरही काम वेगाने सुरू आहे. त्याचबरोबर भारतीय हवाई दल तीन हाय अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म सिस्टीम विमाने तयार करत आहे. ही विमाने मानवरहित असतील आणि उपग्रहाच्या आधारे धावतील.
संबंधित बातम्या