Chandrayaan-3: चांद्रयान-३ च्या यशानंतर भारतात दरवर्षी २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्रिमंडाळाने घोषणा केली आहे. भारताचे चांद्रयान-३ अंतराळाने २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले. प्रत्येक भारतीयांसाठी तो अभिमानाचा क्षण ठरला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिलाच देश आहे. भारताच्या या कामगिरीचे संपूर्ण जगातून कौतुक होत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रीमंडाळाने २३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली.
इस्त्रोच्या चंद्र मोहिमेच्या यशानंतर संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा केला गेला. चंद्रावर पोहोचणारा भारत चौथा देश ठरला आहे. तर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश बनला आहे. आतापर्यंत कोणत्याही देशाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवता आले नाही. देशाच्या या यशस्वी कामगिरीबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स परिषदेदरम्यान देशाला संबोधित करताना भारताने यशाचे शिखर गाठल्याचे त्यांनी म्हटले.
पुढे नरेंद्र मोदी म्हणाले होते की, २३ ऑगस्ट हा भारतीय अवकाश क्षेत्रासाठी इतिहासिक दिवस आहे. यापुढे दरवर्षी भारतात २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा केला जाईल. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.
मंत्रिमंडाळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना संबोधित करताना मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, “चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचे अंतराळयान चांद्रयान-३ ने यशस्वी लँडिंग केली. पंतप्रधान मोदींच्या अतूट विश्वासाने शास्त्रज्ञांना प्रेरणा दिली आहे. त्यामुळे २३ ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.”