India Heat Wave : मान्सून केरळमध्ये दाखल झाला असला तरी उत्तर भारत उष्णतेच्या लाटेने भाजून निघत आहे. तापमानाने मागील सर्व रेकॉर्ड मोडीत काढत नवे उच्चांक नोंदवले आहे. दिल्लीचे तापमान ५२ अंशावर गेल्यानंतर खळबळ माजली असताना आता नागपूरचा पारा चक्क ५६ अंशावर गेल्याने हाहाकार माजला आहे. वाढत्या उकाड्याने लोकांचे हाल होत असून हवामान विभागाने बिहारसह अनेक राज्यात अलर्ट जारी केला आहे.देशात उष्णतेच्या लाटेने विविध राज्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेच्या लाटेने भयावय रुप घेतले असून बळींचा आकडा शंभरच्या वर पोहोचला आहे.
देशात उष्णतेच्या लाटेमुळे (HeatWave) परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली असूनबिहारमध्ये आतापर्यंत५५, झारखंडमध्ये ५ आणि ओडिशामध्ये ४१ तर महाराष्ट्रात उष्माघातामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. उन्हाचा कडाका लोकांसाठी जीवघेणी ठरत आहे. या कारणामुळे बळींची संख्या वाढली आहे. केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नसला तरी बळींचा आकडा १०० पार गेला आहे. बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले असून मृतांचा आकडा५०हून अधिक आहे.
विदर्भाचा पारा वाढला असून उष्माघाताने आतापर्यंत ४ बळी घेतले आहेत. यवतमाळमध्ये दोघांचा,बुलढाण्यात व भंडाऱ्यात एकाचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात उष्माघाताने नऊ महिन्याच्या चिमुकलीसह वृद्धाचा मृत्यू झाला. दादाजी मारुती भुते (वय ७०) असे उष्माघातात बळी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे. बुलढाण्यात संग्रामपूर येथे शेतात काम करत असताना मजुराचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. सचिन वामनराव पेठारे असं उष्माघाताने मृत्यू झालेल्या ४०वर्षीय मजुराचं नाव आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भातील ठराविक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान ताशी४०ते५० किमी वेगानं वारे वाहण्याचाही अंदाज आहे. मुंबई, पालघर, ठाणे भागांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहणार असून, दमट हवामान राहील असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर चांगलीच तापली आहे. नागपूरचं तापमान काल, गुरुवारी तब्बल ५६ अंश सेल्सिअसवर पोहोचलं होते. दिल्लीतील मंगेशपुरी भागात दोन दिवसांपूर्वी ५२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. हे तापमान देशातील सर्वाच्च होते. मात्र दोनच दिवसात दिल्लीला मागे टाकलं आहे. नागपूरच्या तापमानात अनपेक्षित वाढ झाली आहे.