israel lebanon war : इस्रायल-लेबनॉन सीमेवरील युद्धजन्य परिस्थिती पाहता संयुक्त राष्ट्र संघाने चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शांती सेनेत भारतीय जवानांना पाठवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. शनिवारी लेबनॉनमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेत (यूएनआयएफिल) भारतीय सैनिक सामील झाले. त्याचवेळी इस्रायली लष्कराच्या कारवाईच्या विरोधात उभे राहिले. इस्रायलने लेबनॉनमध्ये केलेल्या हल्ल्यात संयुक्त राष्ट्र संघाचे दोन शांतीरक्षक जखमी झाले आहेत.
न्यू यॉर्क येथील संयुक्त राष्ट्र संघाच्या भारताच्या स्थायी मिशनने एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतीसेनेत योगदान देणारा एक प्रमुख देश म्हणून भारत युनिफिलच्या ३४ लष्करी देशांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनाच्या पाठीशी पूर्णपणे उभा आहे. शांतता रक्षकांची सुरक्षा महत्वाची आहे. यूएनएससीच्या विद्यमान ठरावांनुसार शांती सेनेतील जवानांची सुरक्षा सुनिश्चित करायला हवी असे पोस्टमध्ये लिहिले आहे.
दक्षिण लेबनॉनमधील नाकोरा येथील वॉचटॉवरजवळ इस्रायलने केलेल्या हल्ल्यात श्रीलंकेचे दोन शांतीरक्षक जखमी झाल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली आहे. गेल्या ४८ तासांत दुसऱ्यांदा या भागातील शांतीसैनिकांच्या मुख्य तळावर बॉम्बहल्ले करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाचे कर्मचारी आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेची हमी देण्यात यावी, असे या दलाने म्हटले आहे.
लेबनॉनमध्ये शांतीसेनेत १२ पेक्षा अधिक देशांचे तब्बल १०,००० हून अधिक शांतीरक्षक तैनात आहेत. यात भारतीय सैनिकांची संख्या दुसऱ्या क्रमांकाची आहे. तब्बल ९०० भारतीय सैनिक या ठिकाणी तैनात आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याला लक्ष्य करणाऱ्या इस्रायलच्या कारवायांबाबत भारताची अस्वस्थताही या निवेदनात दिसून येते. गेल्या वर्षभरापासून भारत हमास आणि हिजबुल्लाहविरोधात इस्रायलच्या कारवाईच्या विरोधात तटस्थ भूमिका घेत आहे. मात्र, पहिल्यांदाच भारताने इस्रायलविरोधात भूमिका घेतली आहे.
दक्षिण लेबनॉनमधील लढाईत संयुक्त राष्ट्रांचे शांतीरक्षक अडकल्याच्या बातम्या आणि येथील शांतीसेनेच्या जवानांच्या सुरक्षा परिस्थितीवर भारताने चिंता व्यक्त केली. ब्लू लाईनवरील ढासळत्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल आम्ही चिंतित असून आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. १२० किलोमीटरलांबीची ब्लू लाइन ही संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेली सीमारेषा असून दक्षिण लेबनॉनमधून इस्रायली सैन्य माघारी दर्शवते. ही रेषा लेबनॉनला इस्रायल आणि गोलन हाइट्सपासून वेगळे करते. ही दोन्ही देशांची अधिकृत आंतरराष्ट्रीय सीमा नाही.
'प्रत्येकाने संयुक्त राष्ट्र संघाच्या परिसराचा आणि शांती सैनिकांचा प्रत्येकाने आदर करायला हवा, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. इस्रायलच्या लष्करी कारवाईचा बचाव करताना इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझार यांनी शुक्रवारी सांगितले की, हिजबुल्लाह युनिफिल चेकपोस्टजवळ इस्रायलवर गोळीबार करत आहे आणि शांतीरक्षकांचा ढाल म्हणून वापर करत आहे. इस्रायल संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याच्या संरक्षणासाठी पावले उचलत राहील.
संबंधित बातम्या