Modi Trump Meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान भारताने मोठा निर्णय घेत अमेरिकन दारूवरील शुल्कात मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. भारताने बॉर्बन व्हिस्कीवरील आयात शुल्क ५० टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. अमेरिकेसोबत व्यापार करारावर वाटाघाटी सुरू करण्याच्या योजनेच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. बोरबॉन व्हिस्कीवरील सीमा शुल्कात कपात करण्याची अधिसूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्या १३ फेब्रुवारीच्या चर्चेपूर्वी जारी करण्यात आली होती.
बोरबॉन व्हिस्कीच्या आयातीवर आता १५० टक्क्यांऐवजी ५० टक्क्यांपर्यंत सीमा शुल्क आकारण्यात येणार असल्याचे महसूल विभागाने एका अधिसूचनेत म्हटले आहे. या निर्णयानुसार इतर मद्याच्या आयातीवरील सीमा शुल्कात कोणतीही कपात केली जाणार नाही आणि त्यावर १०० टक्के शुल्क आकारले जाणार आहे. अमेरिका हा भारताला बोरबॉन व्हिस्कीचा निर्यातदार देश असून भारतात आयात होणाऱ्या मद्यांपैकी एक चतुर्थांश मद्य अमेरिकेतून येते.
यापूर्वी भारताने २०२३-२४ मध्ये २.५ दशलक्ष डॉलरची बॉर्बन व्हिस्की आयात केली होती. भारताने अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर आणि इटली या देशांमधून याची आयात केली. पंतप्रधान मोदी आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गुरुवारी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले आणि तेथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात भारत आणि अमेरिका यांनी द्विपक्षीय व्यापार २०२३ पर्यंत दुपटीने वाढवून ५०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान , पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी ट्रम्प यांनी भारतासह जगातील सर्व देशांवर परस्पर कर लावण्याची घोषणा केली होती. माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, ते केवळ भारतावरच नव्हे तर सर्व देशांवर हे शुल्क लादत आहेत. मोदींशी झालेल्या चर्चेत ट्रम्प यांनी व्यापार तूट कमी करण्यासाठी भारत अमेरिकेकडून अधिक तेल, गॅस आणि लष्करी उपकरणे खरेदी करेल, अशी घोषणा केली होती, परंतु अमेरिका भारतावर परस्पर शुल्क लादण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
संबंधित बातम्या