Monkeypox: चिंताजनक! मंकीपॉक्सची भारतात एन्ट्री, परदेशातून परत आलेल्या व्यक्तीमध्ये आढळली लक्षणे-india reports first suspect case of monkeypox ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Monkeypox: चिंताजनक! मंकीपॉक्सची भारतात एन्ट्री, परदेशातून परत आलेल्या व्यक्तीमध्ये आढळली लक्षणे

Monkeypox: चिंताजनक! मंकीपॉक्सची भारतात एन्ट्री, परदेशातून परत आलेल्या व्यक्तीमध्ये आढळली लक्षणे

Sep 08, 2024 06:28 PM IST

India reports first suspect case of Monkeypox: भारतात मंकीपॉक्स संक्रमित संशयित रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

भारतात आढळला मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण
भारतात आढळला मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण

Monkeypox In India: कोरोनामुळे आधीच अनेक समस्यांचा सामना करावा लागलेल्या भारतीयांसमोर नवं संकट उभे राहिले आहे. परदेशातून भारतात परतलेल्या एका व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सचे लक्षणे आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. या रुग्णाला विलगीकरणासाठी एका रुग्णालयात ठेवण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून रुग्णाच्या नमुन्याची चाचणी केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने १४ ऑगस्ट २०१४ रोजी मंकीपॉक्सला आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली. जागतिक उद्रेकाची पहिली घोषणा २०२२ मध्ये करण्यात आली जेव्हा जगभरातून प्रकरणे समोर येऊ लागली.

पीआयबीच्या अहवालानुसार, हे प्रकरण सरकारने जारी केलेल्या गाईडलाइननुसार हाताळले जात आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधून त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाले आहे.

केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना सूचना

मंकीपॉक्सबाबत आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. डब्ल्यूएचओने सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केल्यानंतर सरकारने दक्षता सूचना जारी केल्या आहेत. परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची वेद्यकीय तपासणी केली जात आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सर्व राज्यांना आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मंकीपॉक्स विषाणूची सर्वप्रथम ओळख कधी झाली?

मंकीपॉक्स हा स्मॉल पॉक्ससारखा विषाणूजन्य आजार आहे. त्याचा माकडाशी काहीही संबंध नाही. ही चेचक कुटुंबाशी संबंधित समस्या आहे. मंकीपॉक्स विषाणूची ओळख सर्वप्रथम १९५८ मध्ये झाली जेव्हा संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये चेचकसारख्या आजाराची लक्षणे आढळली. १९७० मध्ये या आजाराचा पहिला रुग्ण आढळला होता, त्यानंतर २०२२ मध्ये मंकीपॉक्स जगभरात पसरला.

मंकीपॉक्सची लक्षणे

मंकीपॉक्स हा आजार हवेत पसरत नाही. संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कातून आणि लैंगिक संबंधांद्वारे याचा प्रसार होतो. संक्रमित व्यक्तीची दूषित चादर, टॉवेल, कपडे यांच्यामाध्यमातूनही हा आजार होण्याची शक्यता आहे. मंकीपॉक्सच्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये ताप आणि नंतर शरीरावर पुरळ यांचा समावेश आहे. मंकीपॉक्सच्या संक्रमणानंतर संबंधित व्यक्तीच्या चेहऱ्यावर पुरळ दिसते. त्यानंतर संपूर्ण शरिरावर पुरळ पसरतात. तसेच ताप, तीव्र डोकेदुखी, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो. काही लोकांना घसा, डोळे आणि प्रायव्हेट पार्टवर पुरळ येतात, अशी लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.

कोणती काळजी घ्यावी?

या विषाणूपासून वाचण्यासाठी ज्या लोकांचे पुरळ एमपॉक्ससारखे दिसते, त्यांच्या जवळ जाणे टाळावे. तसेच संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले कपडे, चादरी, ब्लँकेट किंवा इतर गोष्टींना स्पर्श करणे टाळावे. साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा. हात धुण्याची व्यवस्था नसल्यास अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझरचा वापर करावा. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, आपल्याला लक्षणे माहिती असणे आणि स्वत: ची वैद्यकीय तपासणी करून घेणे, आवश्यक आहे.

Whats_app_banner
विभाग