HMPV Virus in India: एचएमपीव्ही अर्थात ह्युमन मेटान्यूमो व्हायरसने भारतातही धडक दिली आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण आढळला आहे. आठ महिन्यांच्या बाळाला ताप आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बाळाची एचएमपीव्ही चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली आहे. चीनमध्ये एचएमपीव्हीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे वृत्त आहे.
सध्या या मुलावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे यासंबंधी कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. कर्नाटकच्या आरोग्य विभागाने मुलामध्ये एचएमपीव्हीची पुष्टी केली आहे. बालकाची वैद्यकीय चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे विभागाचे म्हणणे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयालाकडूनही याबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र, चीनमध्ये पसरणारा एचएमपीव्हीचा हाच स्ट्रेन आहे की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारत सर्व उपलब्ध चॅनेलद्वारे परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि डब्ल्यूएचओला वेळेवर अपडेट्स सामायिक करण्याची विनंती देखील केली आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एचएमपीव्ही प्रकरणांची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या वाढविली जाईल आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च वर्षभर एचएमपीव्ही ट्रेंडचा मागोवा घेईल. आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अध्यक्षतेखाली संयुक्त देखरेख गटाची बैठक शनिवारी झाली. आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी सांगितले की, मानवी मेटान्यूमोव्हायरस हा इतर श्वसन विषाणूंसारखाच आहे, ज्यामुळे सामान्य सर्दी होते. यामुळे लहान वयात किंवा वृद्धांमध्ये फ्लूसारखी लक्षणे दिसू शकतात.
मानवी मेटान्यूमो व्हायरस हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे, ज्यामुळे सर्दीचा त्रास सुरू होतो. हा एक हंगामी रोग आहे, जो रेस्पिरेटरी सिंकिटल व्हायरस आणि फ्लूसारखा हिवाळा आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. एचएमपीव्ही हा नवीन सापडलेला विषाणू नाही. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने सांगितले की, २००१ मध्ये पहिल्यांदा ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस संक्रमित रुग्ण आढळून आला होता.
एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अॅडव्हायजरी जारी करण्यात आल्या आहेत. तेलंगणामध्ये राज्य सरकारने साबण आणि पाण्याने नियमितपणे हात धुणे किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर करणे, गर्दीची ठिकाणे टाळणे आणि सुरक्षित अंतर राखणे यासह इतर खबरदारीघेण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याची यादी जारी केली आहे. केरळमध्ये आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या की, चीनमध्ये व्हायरल फिव्हर आणि श्वसन संसर्गाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याच्या बातम्यांवर राज्य सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि सध्या घाबरून जाण्याची गरज नाही.
संबंधित बातम्या