Nuclear Missiles Weapon : अण्वस्त्रांच्या संख्येच्या बाबतीत भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे, तर चीनने देखील अण्वस्त्रांच्या साठ्यात मोठी वाढ केल्याचा दावा स्वीडिश थिंक टँकने सादर केलेल्या अहवालात करण्यात आला आहे. चीनच्या अण्वस्त्रांची संख्या जी गेल्या वर्षी जानेवारीत ४१० होती, ती यावर्षी जानेवारीत ५०० झाली आहे. पाकिस्तानकडे १७० तर भारताकडे १७२ अण्वस्त्र आहेत. या पूर्वी भारताकडे १५० च्या आसपास अण्वस्त्रे होती. तर पाकिस्तानकडे देखील तितकीच होती. मात्र, यानंतर त्यात वाढ करून पाकिस्तानने ही संख्या १७० वर नेली होती.
गेल्या दोन वर्षांत जग दोन मोठ्या युद्धांचे साक्षीदार झाले आहे. जगत रशिया यूक्रेन आणि इस्रायल हमास संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने त्यांचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, अण्वस्त्रांनी सज्ज असलेले नऊ देश आणि त्यात भारत, पाकिस्तान आणि चीन यांचाही समावेश आहे. हे देश त्यांच्या अण्वस्त्र शस्त्रात वाढ करत आहेत. तसेच त्यांचे आधुनिकीकरण करत आहेत.
या अहवालानुसार, जगभरात २,१०० अण्वस्त्रे आहेत, त्यापैकी बहुतांश रशिया आणि अमेरिकेकडे आहेत. सर्व रशियन आणि यूएस शस्त्रे हाय ऑपरेशनल अलर्टवर असतात. तसेच ती प्रक्षेपित करण्यासाठी बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या प्रमुख युद्ध प्रणालीसह वापरण्यासाठी तयार आहेत. काही अहवालांनुसार, चीनने प्रथमच आपली अण्वस्त्रे हाय ऑपरेशनल अलर्ट मोडवर ठेवली आहेत.
भारताकडे १७२ अण्वस्त्रे आहेत, SIPRI अहवालानुसार, जानेवारी २०२४ पर्यंत भारताकडे १७२ अण्वस्त्रे होती, जी पाकिस्तानच्या १७० अण्वस्त्रांपेक्षा २ ने अधिक आहे. अहवालानुसार, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश सातत्याने अण्वस्त्रांचा साठा वाढवत आहेत. SIPRI ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे मुख्य लक्ष्य भारत आहे, तर भारत चीनच्या संपूर्ण भूभागापर्यंत पोहोचू शकणारी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.
भारत, पाकिस्तान आणि उत्तर कोरिया अमेरिका आणि रशियासारख्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर अण्वस्त्रे बसवण्याच्या तयारीत असल्याचेही SIPRI अहवालात स्पष्ट झाले आहे. चीनबद्दल बोलताना SIPRI चे हॅनेस ख्रिश्चन म्हणाले की, या देशाने इतर कोणत्याही देशापेक्षा वेगाने अण्वस्त्रांची निर्मिती केली आहे.