India's Arms Import : भारत ठरला जगातला सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा देश
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  India's Arms Import : भारत ठरला जगातला सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा देश

India's Arms Import : भारत ठरला जगातला सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा देश

Mar 12, 2024 12:49 PM IST

२०१८-२२ मध्ये फ्रान्सच्या शस्त्रास्त्र निर्यातीपैकी ३० टक्के निर्यात भारताला मिळाली आणि रशियानंतर भारताला शस्त्रास्त्रपुरवठा करणारा दुसरा देश म्हणून फ्रान्सने अमेरिकेला मागे टाकले, असे या अहवालात म्हटलेआहे

Dassault Rafale fighter jets (File photo)
Dassault Rafale fighter jets (File photo) (AFP)

जगभरात विविध देशांदरम्यान दरवर्षी होणाऱ्या विविध प्रकारच्या शस्त्रांस्त्रांची खरेदी आणि विक्री प्रक्रियेवर लक्ष ठेवून असलेल्या स्वीडनच्या ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ (SIPRI)चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. भारत हा जगातला सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश असल्याचे या अहवालात म्हटले आहे. २०१८-२०२२ दरम्यान भारत, सौदी अरेबिया, कतार, ऑस्ट्रेलिया आणि चीन हे जगातील पाच सर्वात मोठे शस्त्रास्त्र आयातदार देश ठरले आहेत. तर अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन आणि जर्मनी हे पाच सर्वात मोठे शस्त्रास्त्र निर्यातदार देश ठरले आहेत. २०१८-२२ या कालावधीत पाकिस्तान हा जगातला आठवा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा देश ठरला आहे. पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र आयातीत गेल्या काही वर्षात १४ टक्क्यांनी वाढ झाली असून चीन हा पाकिस्तानचा मुख्य पुरवठादार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. 

शस्त्रास्त्र निर्यातीत फ्रान्सने टाकले अमेरिकेला मागे

२०१८-२२ या वर्षांदरम्यान फ्रान्सने एकूण शस्त्रास्त्र निर्यातीपैकी ३० टक्के निर्यात भारताला केली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे फ्रान्स हा भारताला शस्त्रपुरवठा करणारा रशियानंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. भारताला शस्त्रास्त्र निर्यात करणारा अमेरिका हा तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. भारताची फ्रान्सकडून शस्त्रास्त्र आयात वाढल्याने रशियाकडून होणारा शस्त्रपुरवठा कमी होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

२०१३-१७  आणि २०१८-२२ या कालावधीत फ्रान्सच्या शस्त्रास्त्र निर्यातीमध्ये तब्बल ४४ टक्क्यांनी वाढ झाली असून फ्रान्सकडून बहुतांश शस्त्रास्त्र निर्यात ही आशिया खंडातील देश, ओशिआनिया भागातील देश आणि मध्य पूर्वेतील देशांचा समावेश आहे. 

जागतिक शस्त्र बाजारात रशियाच्या शस्त्रास्त्रांच्या निर्यातीत घट होत असल्याने दिसून आले आहे. त्यामुळे फ्रान्सला जगात शस्त्र बाजारात मोठा वाटा मिळत असल्याचे ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या आर्म्स ट्रान्सफर विभागाचे वरिष्ठ संशोधक पीटर डी वेझमन यांनी म्हटले आहे. २०२२ च्या अखेरीपर्यंत फ्रान्सला मिळालेल्या शस्त्रास्त्रांच्या ऑर्डरची अद्यापही पूर्तता करणे सुरू असल्याचे वेझमन यांनी सांगितले. दरम्यान, जागतिक शस्त्रास्त्र निर्यातीत अमेरिकेचा वाटा ३३ टक्क्यावरून ४० टक्क्यांपर्यंत वाढला असून रशियाचा वाटा २२ टक्क्यांवरून १६ टक्क्यांवर खाली घसरला असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

जागभरातील देशांमध्ये शस्त्रास्त्रांच्या खरेदी-विक्रीत एकूणच घसरण झाल्याचेही दिसून आले आहे. मात्र रशिया- युक्रेन युद्धामुळे युरोपीय देशांमध्ये शस्त्रास्त्रांची खरेदी झपाट्याने वाढली असल्याचे वेझमन यांनी सांगितलं. 

मध्य पूर्वेतील देशांमध्ये तर शस्त्रास्त्र आयात करण्याची जणू स्पर्धा लागली असल्याचे या अहवालातून दिसून येते. २०१८-२२ या वर्षांदरम्यान जगातील पहिल्या १० शस्त्र आयातदार देशांमध्ये सौदी अरेबिया, कतार आणि इजिप्त या मध्यपूर्वेतील तीन देशांचा क्रमांक लागतो. २०१८-२२ दरम्यान सौदी अरेबिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा शस्त्र आयात करणारा देश होता. २०१३-२०२२ या कालावधीत कतारच्या शस्त्रास्त्र आयातीत ३११ टक्क्यांनी वाढ झाली असून जगातला तिसरा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश बनला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर