मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  चिंताजनक! देशात कोरोनाचा उद्रेक, एका दिवसात ३८ टक्के रुग्णवाढ

चिंताजनक! देशात कोरोनाचा उद्रेक, एका दिवसात ३८ टक्के रुग्णवाढ

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 16, 2022 10:56 AM IST

देशातील पाच राज्यात सर्वाधिक नवे रुग्ण आढळले असून यात एकट्या महाराष्ट्रात ३२.९५ टक्के रुग्ण आहेत.

देशात कोरोनाचा उद्रेक, गेल्या २४ तासात १२२१३ नवे रुग्ण
देशात कोरोनाचा उद्रेक, गेल्या २४ तासात १२२१३ नवे रुग्ण (फोटो - पीटीआय)

भारतात (India) बुधवारी मोठ्या प्रमाणावर नव्या कोरोना रुग्णांची (Covid 19) नोंद झाली आहे. एका दिवसात तब्बल ३८ टक्क्यांहून जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. २४ तासात भारतात १२ हजार २१३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील सक्रीय रुग्णांची संख्या ५८ हजारांच्या वर आहे. (India daily Corona update)

गेल्या दोन दिवसात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ८ हजार इतकी होती. त्याआधी आठवड्याभरात ४ ते ५ हजार यांच्या दरम्यान नवे रुग्ण आढळत होते. मात्र मंगळवारच्या तुलनेत बुधवारी नव्या रुग्णांमध्ये तब्बल चार हजाराने वाढ झाली. सातत्याने वाढत असलेल्या या रुग्णसंख्येमुळे चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे देशात लसीकरणावर भर दिला जात आहे.

देशातील पाच राज्यात रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यात महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक ४०२४ रुग्ण आढळले असून त्याखालोखाल केरळमध्ये (Kerala) ३४८८ नव्या रुग्णांची नोंद झाली. दिल्लीत (Delhi) १३७५ तर कर्नाटकात (Karnataka) ६४८ आणि हरयाणात (Haryana) ५९६ नवे रुग्ण गेल्या २४ तासात आढळले आहेत. या पाच राज्यात देशातील एकूण नव्या रुग्णसंख्येपैकी ८२.९६ टक्के रुग्ण आढळले आहेत. यात एकट्या महाराष्ट्रातील ३२.९५ टक्के रुग्ण आहेत.

देशात बुधवारी एका दिवसात ७ हजार ६२४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानतंर आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या ४ कोटी ३२ लाख ५७ हजार ७३० इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ४ कोटी २६ लाख ७४ हजार ७१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी ५ लाख २४ हजार ८०३ इतकी झाली आहे. देशात सध्या लसीकरण मोहिम सुरू असून आतापर्यंत १ अब्ज ९५ कोटी ६७ लाख ३७ हजार १४ डोस देण्यात आले आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग