जगभर उत्सुकता असलेल्या ब्रिटनच्या सार्वजनिक निवडणूकांसाठी उद्या, ४ जुलै रोजी मतदान होत आहे. ब्रिटनमधला सत्ताधारी कंझरव्हेटिव्ह पार्टी (Conservative Party) आणि लेबर पार्टी (Labour Party) या दोन प्रमुख पक्षांत चुरशीची लढत आहे. यंदाच्या निवडणुकीत कंझरव्हेटिव्ह पार्टीकडून लंडन इथे अनेक वर्षे स्थायिक असलेले सुशील रापटवार यांना ब्रेन्ट वेस्ट (Brent west) या मतदार संघातून उमेदवारी दिली गेली आहे.
सुशील रापटवार हे मूळचे औरंगाबाद (आता संभाजी नगर) येथील रहिवासी आहेत. ते व्यवसायाने इंस्ट्रुमेनटेशन इंजिनिअर आहेत. ते सध्या एका बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. ते बॅडमिंटनचे उत्तम खेळाडू असून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये बॅडमिंटन स्पर्धांसाठी पंच म्हणूनही काम केले आहे. ते लंडनमध्ये दर मंगळवारी एक रेडीओ स्टेशन चालवतात.
सुशील रापटवार यांनी लंडनवरून ‘हिंदुस्थान टाईम्स-मराठी’शी बातचित केली. यावेळी त्यांनी संभाजीनगर ते लंडनचा एकूण प्रवास आणि ब्रिटनच्या राजकारणात प्रवेश याविषयी माहिती सांगितली. ‘कंझरव्हेटिव्ह पार्टीची उमेदवारी कशी मिळाली, असे विचारले असता रापटवार यांनी सांगितले, ‘माझ्या सामाजिक व राजकीय कामांमुळे मी या भागातील लोकांना माहीत होतोच. ब्रिटनमध्ये संसदेच्या निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठी उमेदवाराला अनेक छोट्या छोट्या प्रभांगांमध्ये (County) विजय मिळवावा लागतो. अनेक मुलाखती द्याव्या लागतात आणि ही सर्व प्रक्रिया सुमारे १८ महिने चालते. प्रचार वैयक्तिक संपर्क साधूनच होतो. येथे भव्य पोस्टर्स, होर्डिंग्स, माईकवरून होणारा दणदणीत प्रचार असे काही नसते. माझ्या मतदार संघात साधारण ४१ हजार भारतीय मतदार आहेत. ते मला विजयी करतील अशी मला खात्री वाटते. यावेळची निवडणूक कंझरव्हेटिव्ह पार्टीसाठी थोडी कठीण वाटत होती. परंतु आर्थिक आघाडीवर आम्हाला थोडे यश मिळाल्याने माझ्या पक्षाच्या व माझ्या विजयाची आशा वाढली आहे, असं सुशील रापटवार म्हणाले.
ब्रिटीश संसदेत एकूण ६५० जागा असून ब्रेक्झिटच्या निर्णयानंतर होणारी ब्रिटनची ही पहिली संसदीय निवडणूक आहे.