India Alliance : इंडिया आघाडीचं एक पाऊल पुढे! १३ सदस्यांची समन्वय समिती जाहीर, घोषवाक्यही ठरलं!
India Alliance mumbai Meet latest News : मुंबईत सुरू असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत आज दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
Judega Bharat Jeetega India : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारविरोधात एल्गार पुकारत एकत्र आलेल्या देशभरातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनं आज एक पाऊल पुढं टाकलं. मुंबईत सुरू असलेल्या इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीत १३ जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली. तसंच, आघाडीचं घोषवाक्यही ठरवण्यात आलं.
ट्रेंडिंग न्यूज
देशातील प्रमुख विरोधी पक्षांचा समावेश असलेल्या इंडिया आघाडीची बैठक कालपासून मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये सुरू आहे. आज या आघाडीची औपचारिक बैठक झाली. त्यात राष्ट्रीय पातळीवरील समिती ठरवण्यात आली. या समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेचे संजय राऊत, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, आम आदमी पक्षाचे राघव चढ्ढा, काँग्रेसचे केसी वेणुगोपाल, ओमर अब्दुल्ला, हेमंत सोरेन, टी आर बालू, मेहबुबा मुफ्ती, जावेद खान, लल्लन सिंह, डी. राजा आणि तेजस्वी यादव यांचा समावेश आहे.
आघाडीच्या आजच्या बैठकीत एक घोषवाक्यही निश्चित करण्यात आलं. या घोषवाक्यात भारत या शब्दाचा आवर्जून समावेश करण्यात आला आहे. जुडेगा भारत, जितेगा इंडिया… असं हे घोषवाक्य आहे.
आघाडीचा निमंत्रक कोण?
इंडिया आघाडीच्या निमंत्रकाचं नाव निश्चित होईल अशी चर्चा होती. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाची या पदासाठी चर्चा होती. मात्र, त्यावरून काही वाद होऊ नयेत म्हणून निमंत्रक पदाचा निर्णय टाळण्यात आल्याचं समजतं.
लोगोची प्रतीक्षा
इंडिया आघाडीचा लोगो अद्याप ठरलेला नाही. त्यासाठी काही सूचना आणि प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. ते आल्यानंतर त्यातून लोगो ठरवण्यात येणार आहे. त्याशिवाय जागावाटपावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. जागावाटपाबाबत घाई करू नये असं काँग्रेसला वाटतं. पुढच्या काही महिन्यांत देशात पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यांचे निकाल आल्यानंतर जागावाटपाचा निर्णय व्हावा, असं काँग्रेसला वाटतं. तसं झाल्यास काँग्रेसला आपली बाजू मजबूत करता येईल असा पक्षातील सूत्रांचा होरा आहे.
शरद पवार कोणाच्या नेतृत्वाखाली काम करणार?
आघाडीच्या समन्वय समितीमध्ये शरद पवार यांचा समावेश आहे. आघाडीतल सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी ते एक आहेत. अशा स्थितीत ते नितीशकुमार किंवा मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली काम करतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळंच निमंत्रकाची घोषणा रखडली आहे. समन्वय समितीच्या माध्यमातूनच सर्व निर्णय घेण्याकडं आघाडीचा कल आहे.