PM Modi Interview Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या आधी वृत्तसंस्था ANI ला दिलेल्या मुलाखतीत इलेक्टोरल बॉन्डबाबत म्हटले की, देशाला पुन्हा एकदा काळ्या धनाकडे ढकललं आहे. त्यांनी म्हटले की, निवडणुका काळ्या पैशापासून मुक्त करण्यासाठी इलेक्टोरल बॉन्ड योजना सुरू करण्यात आली होती. मात्र ही योजना रद्द केल्यामुळे निवडणुकात काळ्या पैशाचा वापर वाढताना दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटले की, हे देशासाठी खूपच धोकादायक आहे. त्यांनी इशारा देताना म्हटले की, याचा विरोध करणारे लोक या मुद्द्यावर भविष्यात पश्चाताप करतील.
पंतप्रधान नरेंद्रमोदींनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर इलेक्टोरल बॉन्ड्स स्कीमबाबत खोटा प्रचार केल्याचा आरोप केला. पंतप्रधान मोदींनी म्हटले की, निवडणूक रोखे योजना निवडणुकीत होण्याच्या काळ्य पैशांच्या वापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू केली होती. मात्र विरोधीपक्ष यावर आरोप करून खोटा प्रचार करत आहेत. इलेक्टोरल बॉन्डमुळे जनतेला मनी ट्रेलचा पत्ता लागत होता.
इलेक्टोरल बॉन्ड योजनेचे कौतुक करताना पंतप्रधान मोदींनी म्हटले की, इलेक्टोरल बॉन्ड योजनेमुळे समजले आहे की, कोणत्या कंपनीने पैसे दिले? व कोणत्या पक्षाला दिले. पैसा कोठे दिला व किती दिला?या प्रश्नांची उत्तर आता मिळत आहेत, जे आधी शक्य नव्हते. त्यामुळे मला वाटते की, जेव्हा विरोधक प्रमाणिकपणे याचा विचार करतील तेव्हा त्यांना याचा पश्चाताप होईल. जे लोक डेटा पब्लिक झाल्यामुळे टीका करत आहेत, त्यांना भविष्यात पश्चाताप होईल.
पंतप्रधान मोदींनी म्हटले की, तपास यंत्रणांच्या कारवाईनंतर ज्या १६ कंपन्यांनी इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून जे दान दिले त्यातील केवळ ३७ टक्के पैसे भाजपला मिळाले आहेत. उर्वरित ६३ टक्के भाजप विरोधी पक्षांना मिळाले आहेत.
पीएम मोदींनी म्हटले की, आधी राजकीय पक्ष दान घेत होते मात्र त्याची ऑडिट होत नव्हती. काळ्या पैशाचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी केला जात होता. इलेक्टोरल बॉन्डमुळे मनी ट्रेल समजत होते.
देशात वन नेशन, वन इलेक्शन योजनेवर बोलताना मोदी म्हणाले, अनेकांनी यासाठी आपल्या सूचना सूचना समितीला दिल्या आहेत. अनेक सकारात्मक आणि नाविन्यपूर्ण सूचना आल्या आहेत. समितीच्या अहवालाची अंमलबजावणी केली तर देशाला मोठा फायदा होईल.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशासाठी माझ्याकडे आगामी २५ वर्षाचे व्हिजन आहे. यासाठी मी गुजरातमध्ये असल्यापासून यासंदर्भात विचार करत आहे. २०२४ मध्ये होत असलेल्या या निवडणुका देशासमोरील एक संधी आहे. एक मॉडेल काँग्रेस सरकारचे आणि एक मॉडेल भाजप सरकारचे. त्यांचा ५ ते ६ दशकांचा काळ आणि माझा १ दशकांचा काळ याची कोणत्याही क्षेत्राबाबत तुलना करा, तुम्हाला समजेल. असे मोदी म्हणाले.