भारताच्या स्वांत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी या कार्यक्रमासाठी ३ हजाराहून अधिक वाहतूक पोलीस अधिकारी, १० हजार पोलीस कर्मचारी आणि ७०० कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चेहरा ओळखणारे कॅमेरे बसवले आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी कडक सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ७०० चेहऱ्याची ओळख असलेले सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी केले आहेत.
हे कॅमेरे उत्तर आणि मध्य जिल्ह्यांमध्ये आणि विशेषत: लाल किल्ल्यावर बसवले जातील जिथून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी भाषण करतील आणि व्हीव्हीआयपी हालचालींवर लक्ष ठेवतील आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवतील.
उत्तर जिल्ह्याला ३४६ क्लोज सर्किट टीव्ही कॅमेरे तर मध्य जिल्ह्याला ३५४ कॅमेरे देण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये हाय रिझोल्यूशनसह पॅन-टिल्ट-झूम फीचर्स असतील ज्यामुळे पोलिसांना दूरवरून कोणालाही ओळखता येईल. हे कॅमेरे किल्ल्याभोवती लावण्यात येणार आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
चेहऱ्याची ओळख आणि व्हिडिओ अॅनालिटिक सिस्टीम असलेले कॅमेरे चोख सुरक्षा सुनिश्चित करतील, असे सांगून अधिकारी म्हणाले की, मोदी जेव्हा देशाला संबोधित करतील तेव्हा मुघलकालीन किल्ल्यावर १० हजाराहून अधिक सुरक्षा रक्षक तैनात केले जातील.
कार्यक्रम संपेपर्यंत लाल किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर 'नो ड्रोन झोन' म्हणून निश्चित करण्यात येणार आहे. मोक्याच्या ठिकाणी आवश्यक उपकरणांसह जवान तैनात केले जातील, असे पोलिसांनी सांगितले. ७०० कॅमेऱ्यांपैकी ४० कॅमेऱ्यांचा वापर चेहरा ओळखण्यासाठी, १५ कॅमेरे घुसखोरी शोधण्यासाठी, प्रत्येकी १० कॅमेरे वाहनांच्या नोंदणी प्लेट वाचण्यासाठी आणि लोकांची मोजणी करण्यासाठी आणि पाच बेवारस वस्तू शोधण्यासाठी वापरले जातील.
लाल किल्ल्यावर परंपरेप्रमाणे ड्रोनविरोधी यंत्रणा बसविण्यात येणार असून हवाई संरक्षण तोफा बसविण्यासह दहशतवादविरोधी अनेक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
याशिवाय पंतप्रधान आणि इतर व्हीव्हीआयपी पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी स्नायपर, एलिट स्वाट कमांडो, ड्रोन पकडणारे आणि शार्पशूटर मोक्याच्या ठिकाणी तैनात असतील. दिल्ली पोलिसांनीही गस्त आणि घातपात विरोधी तपासणी वाढवली आहे. हॉटेल, गेस्ट हाऊस, पार्किंग लॉट आणि रेस्टॉरंट्सची तपासणी केली जात असून भाडेकरू आणि चाकरमान्यांची पडताळणी केली जात आहे. रहिवासी व बाजार कल्याण संघटनांच्या बैठका घेण्यात येत आहेत,' अशी माहिती पोलिस उपायुक्त मनोजकुमार मीणा यांनी दिली.
सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी २ ते १६ ऑगस्ट दरम्यान पॅराग्लायडर, हँग-ग्लायडर आणि हॉट एअर बलून सारख्या अपारंपरिक हवाई प्लॅटफॉर्मच्या उड्डाणावर बंदी घातली आहे.दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हँग-ग्लायडर, मानवरहित हवाई वाहने, रिमोटचालित विमाने, हॉट एअर फुगे, लहान आकाराची विमाने किंवा विमानातून पॅरा-जंपिंग यासारख्या "अपारंपरिक हवाई प्लॅटफॉर्म"चा वापर करून काही गुन्हेगार, असामाजिक घटक किंवा भारतविरोधी दहशतवादी सामान्य जनता, मान्यवर आणि महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करू शकतात. आदेशात म्हटले आहे.
त्यामुळे दिल्ली पोलिस आयुक्तांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय राजधानीच्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारचे हवाई प्लॅटफॉर्म उडवण्यास बंदी घातली असून तसे केल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये दंडनीय ठरेल.