Independence Day 2024 : गुरुवारी १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारत आपला ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सकाळी जुन्या दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे नेतृत्व करतील आणि त्यानंतर देशाला संबोधित करतील. उद्या सकाळी लाल किल्ल्यावर सुरक्षा आणि संरक्षण दलाच्या जवानांकडून परेड काढण्यात येणार आहे.
संपूर्ण भारतात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, अतिसुरक्षेच्या ठिकाणी चेहऱ्याची ओळख पटवणारे कॅमेरे आणि स्नायपरसह १० हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मध्य दिल्लीभोवती पोलिस कर्मचाऱ्यांनी नाके उभारले असून या भागातून जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील अनेक मार्ग गुरुवारी सकाळपासून बंद ठेवण्यात आले आहेत.
राष्ट्रीय राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलिस आणि शेजारील राज्यांनी ट्रॅफिक अॅडव्हायजरी जारी केली आहे.
व्यावसायिक अवजड वाहनांच्या प्रवेशासाठी हरियाणा-दिल्ली आणि उत्तर प्रदेश-दिल्लीपासून राष्ट्रीय राजधानीच्या सर्व सीमा बुधवारी रात्री साडे अकरानंतर सील करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय राजधानीत प्रवेश करणाऱ्या वाहनांची योग्य तपासणी केली जाईल, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
स्वातंत्र्यदिनाला राष्ट्रीय सुट्टी असल्याने उद्या दिवसाच्या पूर्वार्धात बहुतांश दुकाने आणि आस्थापना बंद राहतील. सर्व बँका, वित्तीय आस्थापना, तसेच स्टॉक एक्स्चेंज (एनएसई आणि बीएसई) 15 ऑगस्ट रोजी बंद राहतील. उद्या सर्व शैक्षणिक संस्था (शाळा, महाविद्यालये, संस्था) बंद राहतील.
१५ ऑगस्ट ला ड्राय डे असल्याने दारूची सर्व दुकाने आणि मद्यविक्री करणारी आस्थापने बंद राहतील. स्वातंत्र्यदिनी शासकीय कार्यालये आणि आस्थापना, स्मारके आणि इतर संस्था बंद राहतील.
पोलीस ठाणे, रुग्णालये, आरोग्य सुविधा आणि अग्निशमन विभाग यासारख्या सर्व आपत्कालीन सेवा 2024 च्या स्वातंत्र्य दिनी कार्यरत राहतील. सार्वजनिक वाहतूकही नियोजित वेळापत्रकानुसार धावणार असली तरी पहाटेच्या वेळी मार्ग बदलण्यात येणार आहेत.
मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि रेस्टॉरंट्स १५ ऑगस्ट रोजी सुरू राहतील, परंतु मद्यसेवेला परवानगी दिली जाणार नाही.