कोलकाता : संपूर्ण देश प्रत्येक वर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करतात. मात्र पश्चिम बंगाल राज्यातील काही भागात हा दिवस तीन दिवसांनंतर साजरा केला जातो. यामागील कारणही मोठे रंजक आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी पश्चिम बंगाल राज्यातील नदिया आणि मालदा जिल्हे अधिकृतपणे स्वतंत्र भारताचा हिस्सा नव्हते. या दोन जिल्ह्यांना १८ ऑगस्ट १९४७ रोजी भारतात सामील करण्यात आले.
१२ ऑगस्ट १९४७ रोजी व्हायसरॉय लुईस माउंटबॅटन यांनी घोषणा केली की, भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य दिले जाईल. दरम्यान तोपर्यत बंगाल एक वादग्रस्त विषय बनला होता. यामागे ब्रिटिश अधिकारी सिरिल रेडक्लिफ यांची एक मोठी चूक होती. त्यांनी पहिल्यांदा चुकीचा नकाशा बनवला होता. त्यांनी विभाजनानंतर हिंदू बहुल जिल्हे मालदा आणि नदिया पूर्व पाकिस्तान (बांग्लादेश) ला दिले होते.
माउंटबॅटनच्या घोषणेनंतर मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन झाला होता. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी जल्लोष केला नाही. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि नदिया शाही कुटूंबाच्या सदस्यांनी कोलकाता मधील ब्रिटिश प्रशासनापर्यंत आपली तक्रार पोहोचली. त्यानंतर माउंटबॅटन यांच्या लक्षात ही गोष्ट आणली गेली. काही दिवसानंतर माउंटबॅटन यांनी तात्काळ बंगाल विभाजनाचा आदेश पुन्हा लागू करण्यात आला. त्यानंतर हिंदू बहुसंख्य असणारे जिल्हे भारताला तर मुस्लिम बहुल जिले पूर्वी पाकिस्तानला सोपवले गेले.
ही प्रक्रिया १७ ऑगस्टच्या रात्री पूर्ण करण्यात आली. त्यामुळे भारत-बांग्लादेश सीमेवरील अनेक गावात १५ ऑगस्ट ऐवजी १८ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. नदियातील शिबानीबाश शिवाय शांतिपूर, कल्याणी, बोनगाव, रानाघाट, कृष्णानगर, शिकारपूर आणि करीमपूर पूर्व पाकिस्तानचे भाग होते. त्याचबरोबर मालदा जिल्ह्यातील रतुआ आणि दक्षिण दिनाजपूर, बेलूरघाट गावही १५ ऑगस्टनंतर भारतात सामील करण्यात आले होते. त्यामुळे या सर्व गावांत १८ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिवस साजरा केला जातो. दरम्यान येथील लोकांचे म्हणणे आहे की, ते १५ ऑगस्ट व १८ ऑगस्ट दोन्ही दिवस तिरंगा ध्वजारोहण करतात.