isro news : विमानात उड्डाण करतांना इंटरनेट सेवा मिळत नाही. फोन आपल्याला फ्लाइट मोडवर ठेवावा लागतो. मात्र, आता लवकरच विमानात देखील इंटरनेट वापरता येणार आहे. यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) इस्रोने पुढाकार घेतला आहे. Viasat ही कॅलिफोर्नियास्थित जागतिक उपग्रह कम्युनिकेशन कंपनी भारतीय आकाशात इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे. भारतासाठी ही बाब महत्वाची ठरणार आहे. भारताने या वर्षांच्या अखेरीस आपला सर्वात उच्च-तंत्र उपग्रह 'GSAT-20' प्रक्षेपित करण्याची योजना आखली आहे.
एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, जर सर्व काही योजनेनुसार पार पडले तर, हा उपग्रह भारतीय आकाशात इंटरनेट सेवा अधिक सुलभ आणि प्रभावीपणे देऊ शकतो. हा शक्तिशाली उपग्रह (उच्च रिझोल्यूशन उपग्रह) बेंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत यू. आर. राव सॅटेलाइट सेंटरने तयार केला आहे.
हा उपग्रह हा एक कम्युनिकेशन उपग्रह आहे, जो यापूर्वी प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहांपेक्षा सर्वाधिक प्रगत आहे. हा उपग्रह वेगाने डेटा पाठवू शकतो. GSAT-20 चे प्रक्षेपण भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या उपग्रहामुळे विशेषत: विमानात इंटरनेटचा प्रभावी वापर प्रवाशांना करता येणार आहे.
हा उपग्रह केवळ उपग्रह-आधारित इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणार नाही, तर क्षमतेच्या एक-पंचमांश विमानात इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार आहे. या साठी जागतिक उपग्रह कंपनी Viasat Inc इस्रोला मदत करणार आहे. भारतीय सशस्त्र दलांनाही हा उपग्रह वेगाने कनेक्टिव्हिटी प्रदान करणार असल्याने याचा संरक्षण दलाल देखील फायदेशीर ठरणार आहे.
भारतात, विमानात इंटरनेट सुविधा प्रदान केली जात नाही. Viasat व ISRO ही सुविधा येणाऱ्या काळात भारतीयांना देणार आहेत. "इस्रोचा GSAT-20 उपग्रह इन-फ्लाइट इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यात मदत करेल व Viasat ही कंपनी या साठी सहयोग करण्यास उत्सुक आहे," असे कंपनीचे सीईओ मार्क डंकनबर्ग यांनी एनडीटीव्हीला सांगितले. विमानाने उड्डाण केल्यानंतर देशांतर्गत उड्डाणांमध्ये इंटरनेट सुविधा दिली जात नाही. भारतात येणारी आंतरराष्ट्रीय विमाने भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करताच इंटरनेटचा वापर बंद करतात. ही भारतीयांसाठी खेदाची बाब आहे.