India weather forecast: देशभरात कडाक्याची थंडी वाढली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुले महाराष्ट्रातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे पुढील दोन- तीन दिवस मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढणार, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच पुढील तीन- चार दिवस उत्तर भारतात दाट धुके कायम राहतील. दिल्ली-एनसीआरपासून उत्तर-पश्चिम आणि ईशान्य भारतापर्यंत लोकांना पुढील चार दिवस थंडीचा सामना करावा लागणार आहे.
महाराष्ट्रात गुरुवारी अकोला (१६.२), अमरावती (१७.२), बुलढाणा (१५.६), ब्रम्हपुरी (१८,५), चंद्रपूर (१६.८), गडचिरोली (१६.४), गोंदिया (१६.८), नागपूर (१६.६), वर्धा (१८.०), वाशिम (१४.२) आणि यवतमाळ (१६.७) येथील तापमानात सर्वाधिक गट झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, देशात लुधियाना, पंजाबमध्ये सर्वात कमी किमान तापमान ३.१ अंश नोंदवले गेले. सोनीपत, झज्जर, नारनौल, जिंद, रेवाडीसह हरियाणातील अनेक ठिकाणी थंडीची लाट कायम आहे. गुरुवारी रात्री नारनौलमध्ये ७.२ अंश तापमानाची नोंद झाली. महेंद्रगडमध्ये किमान तापमान २.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. याशिवाय, राजस्थानच्या गंगानगर, जैसलमेर आणि पिलानीमध्ये हवामान खूपच थंड होते. पिलानीमध्ये ४.९ अंश सेल्सिअस, अलवरमध्ये ५.५, जयपूरमध्ये ५.७ आणि गंगानगरमध्ये ६.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. गंगानगर आणि हनुमानगढमध्ये कमालीचे तापमान १० अंश सेल्सिअसने घसरल्याने नागरिकांनना प्रचंड थंडीचा सामना करावा लागत आहे.
शुक्रवारी सकाळी दिल्ली आणि आसपासच्या भागात दाट धुके असून तापमान ७ अंश ते १८ अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवले जाऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दाट धुक्यामुळे हवामान विभामाने दिल्लीकरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दिल्लीत गुरुवारी किमान तापमान ६.६ नोंदवले गेले.