फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडू, आंध्रात अतिवृष्टी! ९० किमी वेगाने धडकले वादळ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडू, आंध्रात अतिवृष्टी! ९० किमी वेगाने धडकले वादळ

फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडू, आंध्रात अतिवृष्टी! ९० किमी वेगाने धडकले वादळ

Dec 01, 2024 08:22 AM IST

Cyclone Fengal : फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडू व आंध्रप्रदेशला मोठा फटका बसला आहे. तब्बल २५ जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. ९० किमी वेगाने वादळी वारे वाहत असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडू, आंध्रात अतिवृष्टी! ९० किमी वेगाने धडकले वादळ
फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडू, आंध्रात अतिवृष्टी! ९० किमी वेगाने धडकले वादळ (AFP)

Cyclone Fengal : बंगालच्या उपसागरातील ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे तमिळनाडू व  आंध्र प्रदेशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर तब्बल  ताशी ८० ते ९० किलोमीटर इतका वेगाने वारे वाहू लागले होते. हे वादळ किनारपट्टी ओलांडण्याची प्रक्रिया शनिवारी मध्यरात्री सुरू होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला.

  बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळाने तामिळनाडू-पुद्दुचेरी किनारपट्टी पूर्णपणे ओलांडली आहे. हवामान खात्याने ही माहिती दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य बंगालमधील फेंगल चक्रीवादळ गेल्या सहा तासात ताशी १० किमी वेगाने पश्चिम-नैऋत्य दिशेकडे सरकले असून रात्री ९.३० वाजता बंगालच्या उपसागराच्या नैर्ऋत्येला, उत्तर तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ आणि महाबलीपुरमच्या नैऋत्येला आणि चेन्नईच्या वायव्येला ३० किमी अंतरावर केंद्रीत झाले आहे. सायंकाळी साडेपाच वाजता हे वादळ किनारपट्टी ओलांडण्यास सुरुवात झाली. मध्यरात्रीपर्यंत हे वादळ जमिनीवर धडकने अपेक्षित होते.

हे चक्रीवादळ पश्चिम-नैऋत्य ेकडे सरकण्याची शक्यता असून पुद्दुचेरीजवळील कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान उत्तर तामिळनाडू-पुद्दुचेरी किनारपट्टीओलांडण्याची शक्यता आहे. त्याचा वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ८० किमी असेल आणि हा वेग ताशी ९० किमी पर्यंत पोहचू शकतो. या वादळामुळे  मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या तिरुवन्नामलाई, कल्लाकुरिची, विल्लुपुरम आणि कुड्डालोर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. याच कालावधीत तामिळनाडूतील चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम, तिरुवल्लूर, राणीपेट, वेल्लोर, तिरुपाथुर, कृष्णागिरी, धर्मापुरी, सेलम, तिरुप्पूर, इरोड, नमक्कल, करूर, तिरुचिरापल्ली, अरियालुर, पेरंबलुर, मयिलाडुथुराई, तिरुवरूर आणि तंजावूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. डॉप्लर वेदर रडार, चेन्नई कडून या वादळावर  सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

या आधीच्या सर्व चक्रीवादळांपैकी फेंगल बराच काळ आखाती प्रदेशात स्थिर राहिले होते, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्याच्या वेगाचा अंदाज बांधणे आणि त्याच्या मार्गाचा मागोवा घेणे अवघड होते. हे वादळ किनारपट्टीला धडकले आहे.  चेन्नई शहरात पाऊस कमी झाला असला तरी मरीना आणि इलियट्स बीचसह चेन्नई आणि आसपासच्या समुद्रकिनाऱ्यांजवळ जोरदार वारे वाहत आहेत.

शनिवारी दिवसभरात चेन्नईमध्ये ११० मिलिमीटर, तर पुदुच्चेरीमध्ये ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दक्षिण भारतावर वादळाच्या अवशेषांचा प्रभाव तीन ते चार दिवस राहू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे चेन्नई विमानतळावर विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला. कंपन्यांनी विमानप्रवास रद्द केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर