मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Murder Case : श्रद्धाची हत्या केल्याचा पश्चाताप नाही; पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताबचं धक्कादाक वक्तव्य

Murder Case : श्रद्धाची हत्या केल्याचा पश्चाताप नाही; पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताबचं धक्कादाक वक्तव्य

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 30, 2022 09:58 AM IST

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाची पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली असून त्यात त्यानं धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

Shraddha Walker Murder Case In Delhi
Shraddha Walker Murder Case In Delhi (HT)

Shraddha Walker Murder Case In Delhi : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आता दिवसेंदिवस नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. आरोपी आफताबनं ज्या हतोड्यानं आणि करवतीनं श्रद्धाची हत्या करत विल्हेवाट लावली, ती सर्व हत्यारं आता दिल्ली पोलिसांना सापडली आहेत. याशिवाय पोलिसांना दिल्लीतील जंगलांमध्ये आणि आफताबच्या किचनमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले असल्याचीही माहिती आता समोर आली आहे. परंतु आता दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताबची पॉलिग्राफ टेस्ट केली असून त्यात त्यानं धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानुसार, आरोपी आफताबची पॉलिग्राफ टेस्ट केली. त्यात त्यानं श्रद्धाची निर्घृणपणे हत्या केल्याची पुन्हा कबुली दिली आहे. याशिवाय श्रद्धा वालकरच्या हत्येबाबत कोणताही पश्चाताप नसल्याचं सांगितलं. पोलिसांना त्याचं हे वक्तव्य ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी उद्या म्हणजेच एक डिसेंबरला आफताबची नार्को टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता या प्रकरणातील आणखी काही सत्य समोर येण्याची शक्यता आहे.

आरोपी आफताबची ही पाचवी आणि शेवटची पॉलिग्राफ टेस्ट असून त्याचा रिपोर्ट तयार केला जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. याशिवाय आता आरोपीची पॉलिग्राफ टेस्ट पूर्ण झाल्यानंतर आता नार्को टेस्ट करण्याचीही परवानगी कोर्टानं दिल्यानं या प्रकरणात पोलिसांच्या तपासाला धार येणार आहे. जेव्हा आफताबला पॉलिग्राफ टेस्टसाठी नेलं जात होतं त्यावेळी त्याच्यावर काही हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तलवारीनं हल्ला केला होता. त्यानंतर आता त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

आरोपी आफताबनं श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये असताना एका सायकोलॉजिस्ट तरुणीला रुमवर बोलावलं होतं. ते अनेक तास रुममध्ये होते. त्यामुळं आता ती तरुणी कोण होती, याची ओळख दिल्ली पोलिसांनी केली असून तिलाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. याशिवाय दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं मुंबईच्या वसईत आफताबच्या कुटुंबियांची आणि मित्रमैत्रिणींची चौकशी केली असून त्यातूनही प्रकरणात आणखी काही धागेदोरे हाती लागतात का, याची चाचपणी केली आहे.

WhatsApp channel