जीव धोक्यात घालून बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसण्याचे प्रयत्न करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली असल्याचे अमेरिकेच्या कस्टम विभागाच्या तपासात स्पष्ट झाले आहे. या विभागाने नुकतीच आकडेवारी जारी केली असून १ ऑक्टोबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान अमेरिकेच्या सीमेच्या आत बेकायदेशीर मार्गाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तब्बल ९०,४१५ भारतीयांना अटक करण्यात आलेली आहे. यातील ५० टक्के भारतीय हे गुजरात राज्याचे निवासी असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. या कालावधीदरम्यान अमेरिकेत बेकायदेशीरपणे घुसण्याचा प्रयत्न करताना दर तासाला १० भारतीयांना अटक करण्यात आली असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. यापैकी ४३,७६४ भारतीयांना अमेरिका-कॅनडा सीमेवर अटक करण्यात आली आहे.
२०२३ या आर्थिक वर्षात तब्बल ९६,९१७ भारतीयांना बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेच्या सीमेत प्रवेश करताना अटक करण्यात आली होती. २०२४ साली अमेरिका-मेक्सिको सीमेवर २५ हजार ६१६ भारतीयांना अटक करण्यात आली होती, अशी माहिती अमेरिकेच्या कस्टम विभागाच्या आकडेवारीत देण्यात आली आहे.
दरम्यान, मेक्सिको मार्गे अमेरिकेच्या सीमेत होणाऱ्या बेकायदेशीर घुसखोरीच्या प्रमाणात गेल्या काही वर्षात घट झाल्याचे निरीक्षण कस्टम विभागाने नोंदवले आहे. यामागे दोन कारणे असल्याचे अमेरिकेच्या कस्टम विभागाचे म्हणणे आहे. मेक्सिकोमधून अमेरिकेच्या सीमेत अमेरिकेत घुसखोरी करण्यासाठी भारतीयांना घेऊन जाणारे एजंट काही दिवस दुबई अथवा तुर्कीमध्ये थांबा घेतात. त्यानंतर या भारतीयांना विमानाद्वारे मेक्सिकोला घेऊन जातात. परंतु गेल्या काही वर्षांपासून निर्वासितांचा हा बेकायदेशीर प्रवास थांबवण्यासाठी अनेक अमेरिकन कस्टम विभागाचे गुप्तचर दुबई आणि तुर्कीमध्ये सक्रिय झाले असून अशाप्रकारे मेक्सिकोला जाणाऱ्या संशयास्पद प्रवाशांचा आधीच शोध लावतात. विविध विमान कंपन्या आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या मदतीने अमेरिकेच्या गुप्तचरांना अशा प्रकारच्या मानवी तस्करीची श्रृंखला मध्येच तोडल्यामुळे मध्यंतरी अनेक भारतीय प्रवाशांना दुबई अथवा तुर्कीमधून भारतात परत पाठवण्यात आल्याच्या घटना घडलेल्या होत्या. डिसेंबर २०२३ मध्ये अशाप्रकारे चौकशी करून अमेरिकेच्या मार्गावर असलेल्या ३०३ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे विमान फ्रान्समध्ये रोखले होते. नंतर या सर्वांना भारतात परत पाठवण्यात आले होते. यातील बहुतांश तरुण हे गुजरात राज्यातील होते.
दरम्यान, गुजरातमधून बेकायदेशीर अमेरिकेत घुसू पाहणाऱ्यांनी अमेरिकेच्या कस्टम विभागाच्या गुप्तचरांना चकवा देण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. सध्या अनेक गुजराती नागरिक थेट कॅनडाला जातात. कॅनडा आणि अमेरिकेदरम्यान निर्मनुष्य भाग असलेल्या बर्फाळ सीमाभागातील प्रदेशातून पायी चालत अमेरिकेत प्रवेश करतात. या भागात कडाक्याच्या थंडीत पायी चालत बेकायदेशीर सीमा ओलांडत असताना अनेक भारतीय नागरिक दगावल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेश घडवून आणण्यासाठी गुजरातमध्ये एजंटांचा सुळसुळाट झाला असल्याचे गुजरातच्या सीआयडीच्या चौकशीत स्पष्ट झाले होते. हे एजंट विविध गैरमार्गाने तरुणांना अमेरिकेत प्रवेश घडवून आणण्याचे आश्वासन देतात. यासाठी प्रवास खर्च, प्रवासासाठीचा व्हिसा आणि दुबई, मेक्सिकोतील मुक्कामासाठी ६० ते ७० लाख रुपये फी आकारत असल्याची माहिती पुढे आली होती.
संबंधित बातम्या