Nikita Singhania Police Interrogation : बेंगळुरूतील आयटी इंजिनीअर अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया हिनं पतीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. सुसाइड नोटमध्ये म्हटल्यानुसार, मला जर नवऱ्याला छळायचंच असतं तर मी त्याला सोडून गेलेच नसते. मी तीन वर्षे त्याच्यासोबत राहतच नव्हते,' असा दावा निकितानं केला आहे.
आयटी इंजिनीअर अतुल सुभाष यांनी ९ डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्याआधी त्यांनी एक सुसाइड नोट लिहून ठेवली होती. तसंच, व्हिडिओ देखील शेअर केला होता. पत्नी निकिता आणि तिच्या कुटुंबीयांनी पैशांसाठी आपला छळ केल्याचं त्यांनी सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. त्या आरोपांच्या आधारे पोलिसांनी निकिता सिंघानिया (वय २९), तिची आई निशा आणि भाऊ अनुराग (वय २७) यांना अटक करण्यात आली आहे.
सध्या सर्व आरोपींची चौकशी सुरू आहे. आरोप सिद्ध झाल्यास न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करू, असं पोलिसांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे २०२२ मध्ये निकितानं अतुलविरोधात हुंड्याच्या मागणीसाठी छळ आणि मारहाण केल्याची तक्रार दाखल केली होती.
अतुल सुभाष यांनी सिंघानिया कुटुंबीय अनेक गंभीर आरोप केले आहेत. सिंघानिया कुटुंब पैशासाठी माझा छळ करत होतं. माझ्यावरील कायदेशीर खटले मागे घेण्यासाठी त्यांनी तीन कोटी रुपये आणि मुलाला भेटण्याच्या परवानगीसाठी ३० लाख रुपये मागितल्याचा आरोप केला होता. निकितानं सुरुवातीला देखभालीसाठी एक कोटी रुपयांची मागणी केली होती, नंतर ही मागणी वाढवून तीन कोटी रुपये केल्याचा दावाही त्यांनी केला होता.
निकितानं हे सगळे आरोप फेटाळले आहेत. २००२ साली तिनं केलेल्या छळाच्या अतुल सुभाष यांच्यावर आरोप केले होते. लग्नानंतर आपल्याला पशुवत वागणूक दिली गेली. अतुलच्या कुटुंबाच्या हुंड्याच्या मागणीमुळं माझ्या वडिलांची तब्येत खालावली आणि शेवटी त्याचा स्ट्रोक आणि मृत्यू झाला, असं तिनं म्हटलं होतं.
निकिताच्या म्हणण्यानुसार, सुभाषसोबत तिचं लग्न २६ एप्रिल २०१९ रोजी झालं होतं, परंतु जेव्हा तिच्या सासरच्या लोकांनी लग्नात मिळालेल्या भेटवस्तूंबद्दल नाराजी व्यक्त केली आणि आणखी १० लाख रुपयांची मागणी केली, तेव्हापासून सगळं बिघडलं.
निकिताला हरियाणातील गुरुग्राममध्ये, तर तिची आई आणि भावाला अलाहाबादमध्ये अटक करण्यात आली. या तिघांना पुढील कारवाईसाठी बेंगळुरूला नेण्यात आलं. रविवारी पहाटे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांना परप्पना अग्रहरा येथील मध्यवर्ती कारागृहात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
संबंधित बातम्या