Indian Airforce Agniveer Vayu Recruitment 2024: भारतीय हवाई दलात करियर करू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी सुवर्ण संधी चालून आली आहे. अग्निवीर भरती योजनेअंतर्गत २०२४ साठी भारतीय हवाई दलात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्यास १७ जानेवारी २०२४ पासून सुरुवात झाली आहे. या साठी अर्ज करण्याची मुदत ही ६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत असून तब्बल ३५०० पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे १२ उत्तीर्ण विद्यार्थी देखील या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत. तर ऑनलाइन परीक्षा १७ मार्च २०२४ पासून घेतली जाईल.
भारतीय वायुसेनेने १७ जानेवारी २०२४ रोजी IAF अग्निवीर वायू भरती २०२४ साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते IAF अग्निवीरच्या अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर अर्ज करता येणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांमध्ये किमान ५० टक्के गुणांसह १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजी विषयात देखील ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. अर्ज करणारा उमेदवार हा विज्ञान शाखेतील किंवा विज्ञानेतर शाखेतील असावा.
या भरतीसाठी उमेदवारांचा जन्म हा जन्म २ जानेवारी २००४ ते २ जुलै २००७ दरम्यान झालेला असावा. उमेदवाराने निवडीचे सर्व टप्पे पार केल्यास, नावनोंदणीच्या वेळी त्याचे वय २१ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
पहिला टप्पा आणि दुसरा टप्प्यातील परीक्षांनंतर, या दोन्ही टप्प्यातील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.
परीक्षेच्या या टप्प्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नंतर शारीरिक तंदुरुस्ती (Physical Fitness) चाचणी किंवा वैद्यकीय चाचणीसाठी (Medical Test) बोलावले जाईल.
या भरती प्रक्रिया आणि परीक्षेसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. यासाठी उमेदवारांना ५५० रुपये आणि जीएसटी भरावा लागेल. हे शुल्क क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग इत्यादीद्वारे उमेदवारांना भरता येणार आहे.