Jet Airways founder Naresh Goyal : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकले असून त्यांना या प्रकरणी गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. ७४ वर्षीय नरेश गोयल यांना शनिवारी पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याची प्रकृती खालावलेली दिसत होती. ते न्यायाधीशांना म्हणाले, “जीवनाची प्रत्येक आशा मी गमावली आहे, सध्याच्या स्थितीत जगण्यापेक्षा तुरुंगात मरणे चांगले आहे. नियतीने जे लिहून ठेवले आहे त्याला सामोरे जाण्यास तयार आहोत”, अशी हतबलता गोयल यांनी व्यक्त करत ते न्यायाशीशासमोर अक्षरश: रडले.
न्यायालयात हजर होण्यापूर्वी नरेश गोयल यांनी त्यांचा आरोग्य अहवाल कोर्टात सादर केला होता. गोयल म्हणाले की, त्यांना त्यांच्या आजारी पत्नीची खूप आठवण येते. तिची काळजी घेण्यासाठी कुणीही नाही. गोयल यांच्या पत्नी कर्करोग या आजाराने ग्रस्त आहेत. नरेश गोयल यांना १४ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. गेल्या महिन्यात त्याच्या आणि त्याच्या पत्नीवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. ईडीने मागच्या वर्षी नरेश गोयल यांना अटक केल्यानंतर ते आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. शनिवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या समोर त्यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
नरेश गोयल यांची तब्येत लक्षात घेऊन विशेष न्यायाधीश एम.जी.देशपांडे म्हणाले, "न्यायालयाने त्यांच्या वकिलाला त्यांच्या आजारपणाची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या प्रकृतीशी संबंधित सर्व गोष्टी पहिल्या जातील असे आश्वासन देखील यावेळी न्यायालयाने गोयल यांना दिले आहे. गोयल हे जेव्हा कोर्टात उभे होते, तेव्हा त्यांचे हात थरथर कापत होते. त्यांना आधार घेतल्याशिवाय उभे राहता येत नव्हते. दरम्यान, तुरुंग कर्मचाऱ्यांच्या मदतीलाही मर्यादा आहेत, असे न्यायाधीशांच्या टिप्पणीत लिहिले आहे.
न्यायाधीश म्हणाले, "गोयल यांनी सांगितले की, त्यांना वारंवार शारीरिक विधी करण्यासाठी जावे लागते. काही वेळा लघवीद्वारे रक्तही बाहेर येते. त्यांनी सांगितले की, जेजे रुग्णालयात रुग्णांची संख्याही जास्त आहे. अशा परिस्थितीत त्यांना अनेकवेळा लघुशंकेसाठी जावे लागते. डॉक्टरांचा सल्ला घ्यायाला. अपॉइंटमेंट घ्यायला देखील खूप वेळ लागतो. या सगळ्याचा त्याच्या तब्येतीवर वाईट परिणाम होत आहे, असे देखील त्यांच्या वकिलाने कोर्टात सांगितले होते.