तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (mahua moitra) यांनी आज लोकसभेत आरोप केला की, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आणि त्याच्या काही महिने आधी सत्ताधाऱ्यांकडून त्यांचे चीरहरण होत होते. मात्र जनता त्यांच्यासाठी श्रीकृष्ण बनून आली. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा भाषणासाठी उभ्या राहिल्या. त्यांनी म्हटले की,मला सभागृहात बोलू दिले जात नाही. मात्र मला खाली बसवण्याच्या नादात जनतेने भाजपच्या ६३ खासदारांना कायमस्वरुपी घरी बसवले आहे. देशातील जनतेने भाजपच्या जागा ३०३ वरून २४० वर आणल्या.
मोईत्रा यांनी म्हटले की, "द्रौपदी प्रमाणे माझे चिरहरण होत होते. मात्र जनता माझ्यासाठी कृष्ण बनून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निशाणा साधताना मोईत्रा म्हणाल्या की,"आदरणीय पंतप्रधान सर मी तुम्हाला विनंती करते की, तुम्ही येथे एक तासापासून येथे आहात, माझे बोलणेही ऐकून घ्या, घाबरू नका, तुम्ही माझ्या मतदारसंघात दोन वेळा येऊन गेलात, आज तर माझे बोलणे ऐकून घ्या सर.
मोईत्रा यांच्याआधी आपल्या लांबलचक भाषणात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही केंद्र सरकार व भाजपवर घणाघाती हल्लाबोल केला. राहुल गांधी म्हणाले की, भाजप सर्वांना घाबरवत असते. दलित, अल्पसंख्यकांना भाजप भीती दाखवण्याचा प्रयत्न करते. भाजप हिंसा आणि द्वेष पसरवण्याचे काम करते, मात्र काँग्रेस तुम्हाला घाबरत नाही.
भाजपचे लोक हिंदू होण्याचा दावा करतात मात्र हिंदू हिंसक नसतो. मात्र भाजपचे लोक द्वेष पसरवतात आणि हिंसेला प्रोत्साहन देतात.
दरम्यान,भाजपने राहुल गांधी यांचे वक्तव्य हिंदू धर्मावर हल्ला असल्याचा मुद्दा बनवून संसदेत उठवला. पंतप्रधान मोदी यांनी यावर हस्तक्षेप करत म्हटले की, विरोधी पक्षनेत्याने संपूर्ण हिंदू समाज हिंसक असल्याचा आरोप केला आहे. जे चुकीचे आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटले की, संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हटले जाऊ शकत नाही. गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांनी याबद्दल माफी मागण्याची मागणी केली आहे.
संबंधित बातम्या