लग्नाचे आमिष दाखवून एका टेलिव्हिजन म्युझिक चॅनेलच्या अँकरचा पाठलाग करून अपहरण केल्याच्या आरोपाखाली एका ३१ वर्षीय व्यावसायिक महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय करणाऱ्या भोगिरेड्डी तृष्णा नावाच्या महिलेचे नाव दोन वर्षांपूर्वी एका मॅट्रिमोनी वेबसाईटवर टीव्ही अँकर प्रणव सिस्तला यांचे फोटो पाहून त्यांच्या प्रेमात पडली. तृष्णाने प्रोफाईलवर शोध घेतला असता टीव्ही अँकरचा फोन नंबर सापडला. इन्स्टंट मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून तिने प्रणवशी संपर्क साधला असता अँकरने तिला सांगितले की, काही अज्ञात व्यक्तीने त्याचा फोटो वापरून मॅट्रिमोनी साइटवर फेक अकाऊंट तयार केले आहे. याबाबत सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले.
ती महिला अँकरला मेसेज पाठवत राहिली. मात्र, प्रणवने तिचा नंबर ब्लॉक केला. यावर संतापलेल्या तृष्णाने अँकरशी लग्न करण्याचा निर्धार केला. त्यानुसार तिने अँकरच्या अपहरणाची योजना आखली. तिने चार जणांना आपल्या योजनेत सामील करून घेतले. अँकरच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या कारवर ट्रॅकिंग डिव्हाइस देखील बसवले.
दरम्यान, ११ फेब्रुवारी रोजी टीव्ही अँकरचे अपहरण करण्यात आले. जीवाला धोका असल्याच्या भीतीने टीव्ही अँकरने महिलेच्या फोनला प्रतिसाद देण्यास तयार झाला. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकारानंतर अँकरने उप्पल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी महिलेसह अपहरणासाठी नेमलेल्या चौघांनाही अटक केली. पुढील तपास सुरू आहे.