भारतीयांचे चहाचे वेड सर्वश्रूत आहे. चहाची वेळ झाली की, चहाप्रेमींना काहीच सुचत नाही. मात्र याच चहामुळे एक धक्कादायक घटना घडली आहे. उशिराने चहा दिल्याने एका नवरोबाची तळपायाची आग मस्तकात गेली व त्याने रागाच्या भरात पत्नीची हत्या केली. ही घटना मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये घडली आहे
साधना रजक असे मृत पत्नीचे नाव असून मोहित रजक असे आरोपी पतीचे नाव आहे. चहाच्या कारणावरून पतीने पत्नीची हत्या केल्याच्या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. ग्वाल्हेरच्या युनिव्हर्सिटी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही घटना घडली.
साधनाचा विवाह दोन वर्षांपूर्वी मोहित रजक याच्याशी झाला होता. गेल्या महिन्यांपासून दाम्पत्यामध्ये सतत वाद होत होते. मोहित पत्नी साधनाला दररोज मारहाण करत असल्याचे सांगितलं जात आहे.
दोन दिवसांपूर्वी दोघांच्यात पुन्हा वाद उफाळून आला. मोहितने पत्नी साधनाला चहा बनवायला सांगितला होता. मात्र, त्यादरम्यान, दोघांचे कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे साधनाला चहा बनवण्यास खूप उशीर झाला. त्यामुळे नवरा मोहित खूप भडकला. त्याने पत्नीचा गळा दाबला. यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस पुढील तपासणी करत आहे.
पत्नी साधनाने चहा बनविण्यास उशीर झाल्याने दोघांमध्ये मोठा वाद झाला. पती मोहितने पत्नीला बेदम मारहाण केली. पतीने मारहाण केल्यानंतर पत्नीची गळा दाबून हत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली. तर मृत साधनाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे.