Viral news : पती-पत्नीमध्ये भांडणे होणे ही एक सामान्य घटना आहे. परंतु काही वेळा ही भांडणे एवढ्या गंभीर वळणावर पोहोचतात की प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत जाऊन तक्रार दिली जाते तर कधी कोर्टात. सामान्यत: गंभीर कारणे असतील तर पती पत्नी कायद्याचा आधार घेत असतात. मात्र, कर्नाटकातील बंगळुरू येथे एक विचित्र घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका क्षुल्लक व हास्यास्पद कारणावरून पत्नीने आपल्या पतीविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली. पत्नीचे कोर्टात जाण्याचे कारण ऐकून तुम्ही थेट डोक्यावर हात मारून घ्याल. सध्या ही घटना सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी पत्नीच्या या कृतीवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बंगळुरूमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. ज्याने कोर्टातील न्यायाधीशांना देखील चक्रावरून सोडले आहे. एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध घरगुती हिंसाचार अंतर्गत पोलिसात तक्रार दाखल केली आहे, परंतु त्यामागील कारण खूपच धक्कादायकआहे. महिलेचा आरोप आहे की तिच्या पतीने तिला फ्रेंच फ्राईज खायला देत नाही.
महिलेचे म्हणणे आहे की, तिच्या पतीने तिला गरोदरपणात पौष्टिक आहार म्हणून फ्रेंच फ्राई न खाण्याचा सल्ला दिला होता, ज्यामुळे तिला राग आला आणि तिने घरगुती हिंसाचार अंतर्गत पतीविरोधात गुन्हा दाखल केला. महिलेचा दावा आहे की तिच्या पतीने तिला बांगलादेशातील बटाट्यापासून बनवलेले फ्रेंच फ्राईज खाण्यापासून रोखले. त्यामुळे तिने थेट पोलिस स्टेशनगाठत पतीविरोधात तक्रार दिली.
हे प्रकरण कर्नाटक हायकोर्टातही पोहोचले, जिथे पतीने पत्नीने केलेले आरोप निराधार असल्याचे म्हटलं व प्रकरण रद्द करण्याची मागणी केली. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना म्हणाले की, अशा प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदवणे योग्य नाही. न्यायमूर्तींनी टिपणी केली की जर पती पत्नीच्या आरोग्याची काळजी घेऊन तिला काही खाद्यपदार्थ खाण्यापासून रोखत असेल तर त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करणे अयोग्य आहे.
न्यायालयाने महिलेच्या पतीच्या बाजूने निकाल दिला आणि पत्नीने केलेले सर्व आरोप रद्द करण्याचे आदेश दिले आहे. एवढ्या क्षुल्लक कारणावरून पोलिस ठाण्याचा दरवाजा ठोठावणे योग्य नाही, असेही न्यायमूर्ती नागप्रसन्ना म्हणाले.