पंजाबमधील कोटकपूरा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका विवाहितेने पतीच्या कृत्याला कंटाळून आत्महत्या केली. महिलेच्या पतीचे त्याच्या एका मित्रासोबत समलैंगिक संबंध होते. महिला एका मुलाची आई आहे. पोलिसांनी मृत मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तिच्या पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रीना कौर (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा पती, वहिनी आणि एका तरुणाविरोधात (ज्याच्याशी तिच्या पतीचे संबंध होते) गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी फरीदकोट मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे लोक हैराण झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोगा जिल्ह्यातील बाघापुराना येथील गज्जन वाला गावातील रहिवासी साधू सिंह यांनी सांगितले की, त्यांची मुलगी रीना कौर हिचा विवाह कोटकपूरा येथील रहिवासी सोनू सिंह याच्याशी २०१५ मध्ये झाला होता. लग्नानंतर दोघांना एक मुलगा झाला. एके दिवशी दोघेही आपल्या मुलाला घेऊन एका धार्मिक स्थळी दर्शनासाठी गेले होते, त्यांच्यासोबत कोटकपूरा येथील अनमोल ऊर्फ जगविंदर सिंग नावाचा तरुणही गेला होता. यानंतर अनमोलही घरी येऊ लागला.
एके दिवशी रीनाने तिच्या पतीला आणि अनमोलला घरात समलिंगी संबंध ठेवताना पकडले. दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत होते. त्यावरून त्यांनी गदारोळ घातला. सोनूने त्याची पत्नी रीना कौर ची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण तिने या संबंधांना विरोध सुरूच ठेवला. तिच्या वहिनीनेही वहिनीला साथ देण्याऐवजी भावाला साथ दिली. पती आणि वहिनीने ऐकले नाही आणि तिच्यावर घर सोडण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.
पतीच्या समलैंगिक संबंधावरून घरात कलह झाला आणि पतीच्या कृत्याला कंटाळून रीना कौर हिने घरातील खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी मृताच्या वडिलांच्या जबाबावरून महिलेचा पती सोनू सिंग, वहिनी आणि तरुण अनमोल उर्फ जगविंदर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी अद्याप फरार असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या