यूपीतील सहारनपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने पतीने पत्नीला एचआयव्ही बाधित इंजेक्शन दिले. यामुळे महिलेची प्रकृती बिघडली. याप्रकरणी पीडितेने पोलीस ठाणे गाठून पती, दीर, सासू व ननंद विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हे प्रकरण सहारनपूरच्या गंगोह पोलीस स्टेशन परिसरातील आहे. चमनपुरा येथील रहिवासी सुशील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी सोनल हिचा विवाह १५ फेब्रुवारी २०२३ रोजी हरिद्वार जिल्ह्यातील पिरंकालियार पोलिस ठाणे क्षेत्रातील जसवाला गावातील रहिवासी अभिषेक उर्फ सचिन याच्याशी झाला होता. लग्नात वधू पक्षाने हुंड्याच्या रुपात कार व दागिने व लाखो रुपयांची रोकड दिली होती. मात्र इतके देऊनही सासरचे लोक खुश नव्हते. त्यांच्यांकडून अधिक हुंड्याची मागणी केली जात होती. याबाबत दोन्ही बाजुंच्या मंडळींची अनेकवेळा पंचायतही झाली होती.
पंचायतीत झालेल्या निर्णयानंतर समजावून मुलीला तिच्या सासरच्या घरी परत पाठविण्यात आले. पण नंतर तिचा छळ होऊ लागला. तिला मारण्यासाठी एचआयव्ही बाधित इंजेक्शन देऊन तिला एचायव्ही संक्रमिक केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. वडिलांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी पती अभिषेक, मेहुणा विनायक, वहिनी प्रीती आणि सासू जयंती देवी यांच्याविरोधात बीएनएस कलम ४९८ अ, ३२३, ३०७, ३२८, ८२६, ४०६ आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुसरीकडे हुंड्यासाठी पती व सासरच्या छळाला कंटाळून बलिया जिल्ह्यातील एका गावात एका विवाहितेने आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गढवार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुकुऱ्हा गावात जयलाल राजभर याने सुनीता (३०) हिला मारहाण केली. यामुळे वैतागलेल्या महिलेने विष प्राशन करून जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिस अधीक्षक ओमवीर सिंह यांनी सांगितले की, महिलेची आई सीमा देवी यांच्या तक्रारीवरून तिचा पती जयलाल राजभर याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या