Myanmar Soldiers Enters India : भारताचा शेजारी देश म्यानमारधून शेकडो सैनिक भारतीय हद्दीत घुसले आहेत. ईशान्य भारतातील मिझोराम राज्याला लागून असलेल्या सीमेवरून म्यानमारचे सैनिक भारतात घुसले असून त्यामुळं मिझोराम सरकारची चिंता वाढली आहे. मिझोराम सरकारनं केंद्र सरकारला याची माहिती दिली आहे.
म्यानमारमध्ये सध्या बंडखोर सैन्य आणि तिथल्या लष्करी (जुंता) राजवटीच्या सैनिकांमध्ये घनघोर युद्ध सुरू आहे. या लढाईत म्यानमारचे शेकडो सैनिक भारताच्या दिशेनं धावत आहेत. मिझोराम सरकारनं केंद्र सरकारला याबाबत कळवलं असून या सैनिकांना तात्काळ परत पाठवावं, असं आवाहन केलं आहे.
ताज्या चकमकींनंतर म्यानमार लष्कराचे सुमारे ६०० सैनिक भारतात दाखल झाले आहेत. पश्चिम म्यानमारमधील राखीन राज्यातील अरकान आर्मी (एए)च्या बंडखोरांनी लष्कराच्या छावण्या ताब्यात घेतल्याचं वृत्त ‘एनडीटीव्ही’नं सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. बंडखोरांनी छावण्यांवर ताबा घेतल्यामुळं म्यानमारच्या सैनिकांनी तिथून पळ काढला आणि मिझोरामच्या लांगतलाई जिल्ह्यात आश्रय घेतला. सध्या आसाम रायफल्सच्या कॅम्पमध्ये म्यानमारचे हे सैनिक आश्रयास आहेत, अशी माहिती आहे.
मिझोरामचे मुख्यमंत्री लाल दुहोमा यांनी या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे. मिझोरामनं राज्यात आश्रय घेतलेल्या म्यानमार लष्कराच्या सैनिकांना लवकरात लवकर परतण्याचा आग्रह धरला आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी शिलाँगमधील पूर्वोत्तर परिषदेच्या बैठकीच्या आधी सद्यस्थितीची माहिती दिली.
सीएम म्हणाले, "लोक आश्रयासाठी म्यानमारमधून पळून आमच्या देशात येत आहेत आणि आम्ही त्यांना मानवतेच्या आधारावर मदत करत आहोत. म्यानमारचे सैनिक येतच राहतात. ते आमच्याकडे आश्रय मागत आहेत. याआधी आम्ही त्यांना विमानानं परत पाठवलं आहे. आतापर्यंत ४५० सैनिकांना परत पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
याआधी बुधवारी मिझोराममध्ये दाखल झालेल्या म्यानमारच्या २७६ सैनिकांना एअरलिफ्ट करून ऐझॉल इथं आणण्यात आलं. ऐझॉलच्या पश्चिमेला सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या लेंगपुई विमानतळावरून या सर्वांना लवकरच म्यानमार हवाई दलाच्या विमानानं परत पाठवलं जाण्याची शक्यता आहे.