अंतराळात अडकलेली सुनिता विलियम्स अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कसे करणार मतदान? खूपच रंजक आहे प्रक्रिया
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अंतराळात अडकलेली सुनिता विलियम्स अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कसे करणार मतदान? खूपच रंजक आहे प्रक्रिया

अंतराळात अडकलेली सुनिता विलियम्स अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कसे करणार मतदान? खूपच रंजक आहे प्रक्रिया

Nov 05, 2024 10:32 PM IST

US election 2024 : अमेरिकन निवडणुकीत नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. त्याचबरोबर अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सही या निवडणुकीत मतदान करणार आहेत. जाणून घेऊया खास प्रक्रिया..

सुनीता विल्यम्स अंतराळातून करणार मतदान
सुनीता विल्यम्स अंतराळातून करणार मतदान

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. देशाचा नवा राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदार मतदान केंद्रांवर जाऊन आपला हक्क बजावत आहेत.  यावेळी अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांच्यात कडवी लढत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत, तर अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सही या निवडणुकीत मतदान करणार आहेत. यासाठी नासाने खास योजना आखली आहे.

सध्या अंतराळात चार अमेरिकन लोक या निवडणुकीत मतदान करण्यास इच्छुक आहेत. यामध्ये सध्या अंतराळात अडकलेल्या बोईंग स्टारलाइनर मोहिमेतील अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा समावेश आहे. फेब्रुवारीपर्यंत ते पृथ्वीवर परतणार नाहीत. भारतीय वंशाच्या ज्येष्ठ अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी सप्टेंबरमध्ये पत्रकार परिषद घेऊन अंतराळातून मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. एक नागरिक म्हणून हे आमचे परम कर्तव्य आहे आणि मी अंतराळातून मतदान करण्यास उत्सुक आहे, हा एक अनोखा अनुभव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अंतराळातून मतदान कसे केले जाते?

नासाने अंतराळात असलेल्या अंतराळवीरांसाठी एक खास प्रक्रिया तयार केली आहे, ज्यामुळे ते अंतराळ स्थानकातून मतदान करू शकतील. ही प्रक्रिया गैरहजर मतदान पद्धतीप्रमाणे काम करते. प्रथम, अंतराळवीर फेडरल पोस्ट कार्ड अर्ज भरून अनुपस्थित मतपत्रिकेची विनंती करतात. यानंतर त्यांना इलेक्ट्रॉनिक बॅलेट पाठवले जाते जे ते भरून मतदान करतात.

हे इलेक्ट्रॉनिक बॅलेट नासाच्या ट्रॅकिंग अँड डेटा रिले सॅटेलाईट सिस्टीमद्वारे पृथ्वीवर पाठवले जाते. न्यू मेक्सिकोतील नासाच्या केंद्रात प्राप्त होते. त्यानंतर टेक्सासमधील जॉन्सन स्पेस सेंटरमधील मिशन कंट्रोल सेंटरमध्ये पाठवले जाते. तेथून मतदान त्या त्या काउंटीच्या लिपिकाकडे पाठवले जाते, जो मतदानाला अंतिम रूप देतो. गोपनीयता राखण्यासाठी मतपत्रिका एन्क्रिप्टेड केली जाते, जेणेकरून संबंधित अंतराळवीर आणि लिपिकांनाच ते पाहता येईल.

इतिहासात अंतराळातून मतदान केव्हा झाले?

१९९७ मध्ये डेव्हिड वुल्फ यांनी अंतराळातून मतदान करणारे पहिले अमेरिकन नागरिक म्हणून इतिहास रचला. तेव्हापासून अनेक अंतराळवीर ही प्रक्रिया अवलंबत आहेत. नासाच्या म्हणण्यानुसार, केट रुबिन्स यांनी २०२० च्या अमेरिकन निवडणुकीत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून मतदान केले होते आणि अंतराळातून मतदान करणारी ती शेवटची अंतराळवीर होती.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर