भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (sunita Williams) जून महिन्यापासून अंतराळात अडकून पडल्या आहेत. त्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या कमांडर असून अंतराळाशी संबंधित विविध प्रयोग करत आहेत. सुनीता यांनी नुकताच काही विद्यार्थ्यांशी व्हर्च्युअली संवाद साधून अंतराळात पाणी कसे पितात हे सांगितले. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी मॅसेच्युसेट्समधील नीडहॅम या आपल्या मूळ गावी एलिमेंटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांशी हा संवाद साधला होता. यावेळी एका विद्यार्थिनीने सुनीताला अंतराळ मोहिमेदरम्यान पाणी कसे पितात, असे विचारले, त्यानंतर सुनीताने पाण्याचे पाकीट काढले त्यामधून स्ट्रॉ च्या माध्यमातून पाण्याचे काही बुडबुडे बाहेर आले. हेच बुडबुडे सुनीताने स्पेसक्राफ्टमध्ये हवेत उडत प्राशन केले. सुनीता आणि विल्मोर बुच यांनी नुकतेच अंतराळात आपले सहा महिने पूर्ण केले. जूनच्या पहिल्या आठवड्यात स्टारलायनर अंतराळयानातून दोघेही अंतराळात गेले होते, मात्र तांत्रिक अडचणींनंतर आता दोघांनाही पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत तेथेच राहावे लागणार आहे.
सुनीता अंतराळ स्थानकात विविध प्रकारची कामे करत आहे. कधी ती बाथरूम साफ करते, तर कधी ती शेतकरी बनते. अलीकडे अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात सुनीता यांनी लेट्यूस (कोशिंबीराची पाने) पिकवली आहे. या माध्यमातून मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये वेगवेगळ्या पाण्याच्या प्रमाणात भाज्या कशा वाढतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
नुकताच सुनीताच्या एका फोटोमुळे खळबळ उडाली होती. त्यांच्या तब्येतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. एका फोटोत सुनीता खूपच कमकुवत दिसत होती. तिचे गाल खूप आत गेल्याचे दिसत होते. तसेच तिचे शरीरही दुबळे दिसत होते. नासापासून जगभरातील शास्त्रज्ञांना हे पाहून आश्चर्याचा धक्का बसला. मात्र नंतर सुनीताने स्पष्ट केले की, अंतराळात जाताना तिचे वजन जेवढे होते तेवढेच आहे आणि ती पूर्णपणे निरोगी आहे.
संबंधित बातम्या