मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nitin Gadkari : नितीन गडकरींनी कसं घटवलं ५० किलो वजन?; सांगितला स्वत:चा डाएट प्लान

Nitin Gadkari : नितीन गडकरींनी कसं घटवलं ५० किलो वजन?; सांगितला स्वत:चा डाएट प्लान

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 29, 2023 11:52 AM IST

Nitin Gadkari Weight : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपलं ५० किलो वजन घटवलं असून हे कसं साध्य केलं याची माहितीही दिली आहे.

Nitin Gadkari
Nitin Gadkari

Nitin Gadkari Weight loss tips : मोदी सरकारमधील एक कार्यक्षम मंत्री व भाजपमधील वजनदार नेते अशी ओळख असलेले नितीन गडकरी यांच्या शारीरिक वजनाची चर्चाही अधूनमधून होत असते. अनेकदा ते स्वत:च ही चर्चा सुरू करतात. राजकारणातील त्यांचं वजन अद्याप कायम असलं तरी शारीरिक वजन त्यांनी ५० किलोनं घटवलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

खुद्द नितीन गडकरी यांनीच एका मुलाखतीत ही माहिती दिली. आपलं वजन नेमकं कसं कमी झालं हेही त्यांनी यावेळी सांगितलं. गेल्या काही वर्षांत ५० किलो वजन कमी केल्याचं गडकरी यांनी सांगितलं. 'माझं वजन १३५ किलोपर्यंत वाढलं होतं, ते आता ८५ पर्यंत खाली आलं आहे, असं ते म्हणाले.

'मी २०११ पासून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतोय. या १२ वर्षांत माझी संपूर्ण जीवनशैली बदलली आहे. याआधी माझ्या आयुष्यात वेळापत्रक नावाचा प्रकार नव्हता. मी खवय्या आहे. वेगवेगळ्या गोष्टींची चव चाखायचो. वेळीअवेळी खायचो. पण आता आहार खूप कमी केला आहे. दोन वेळेला भाकरी, थोडा भात, डाळी आणि भाजी असा आहार घेतो. दररोज किमान दीड तास चालण्यात आणि प्राणायाम करण्यात घालवतो, असं त्यांनी सांगितलं.

'खाण्यापिण्यावर मी खूप नियंत्रण मिळवलं आहे. प्राणायामाचा मला खूप फायदा झालाय. माझ्या शरीरात झालेला बदल पाहून समाधान वाटतं. पूर्वी पूर्ण ताट रिकामं करायचो, आता खूप संयम बाळगतो. माझी खाण्याची आवड कमी झालेली नाही. बऱ्याचदा संध्याकाळच्या वेळी मी रेस्टॉरंटमध्ये जातो, पण खाण्याचं प्रमाण खूपच मर्यादित केलंय, असं त्यांनी सांगितलं.

तुम्हाला दिल्ली आणि मुंबई पैकी कुठलं जेवण आवडतं असं विचारलं असता, दिल्लीत बटाट्याचे पराठे आणि पनीर सर्रास मिळतात. पण मुंबईत खाण्यापिण्याची जी विविधता आहे, तितकी दिल्लीत नाही. मुंबईत अर्ध्या रात्रीही सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. जेव्हा-केव्हा मी मुंबईत असतो, तेव्हा अनेकवेळा बाहेर जेवायला जातो, असंही त्यांनी सांगितलं.

WhatsApp channel

विभाग